काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतीच मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही अशी प्रतिक्रिया दिली. त्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता, शरद पवारांनी दिलेले उत्तर लक्ष वेधून घेणारे आहे. राहुल गांधी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नाहीत हे ऐकून मी आनंदी आहे असे पवारांनी म्हटले आहे. मला पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा नाही असे राहुल गांधी यांनी सोमवारी म्हटले होते. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
आगामी २०१९च्या निवडणुकांच्या रणनीतीची तयारी राजकीय पक्षांकडून सुरु झाली आहे. या निवडणुकीत भाजपा विरोधात सर्व पक्षीय असा सामना होईल असे नुकतेच राहुल गांधी म्हटले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी मोदींना पराभूत करण्यासाठी नवा फॉर्म्युला सांगितला आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक सोमवारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, जे भाजपासोबत नाहीत त्यांना सर्वांना आम्ही बरोबर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या राज्यामध्ये जो पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे, त्या पक्षाला दुसरे पक्ष सहकार्य करतील. ज्यांचे सर्वाधिक खासदार असतील त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल.
दरम्यान राहुल गांधी यांनी आपण पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही असे सांगितले त्याने आपल्याला आनंदच झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांना पंतप्रधान व्हायचे आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात कायमच रंगते. स्वतः शरद पवार यांनी आपण पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये नसल्याचे अनेकदा सांगितले आहे. मात्र राहुल गांधी यांनी पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये नसल्याचे सांगताच आपल्याला आनंद वाटल्याचे शरद पवार म्हटले आहेत. ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 7:54 pm