हिंदुत्व धर्मातरास परवानगी देत नाही, उलट सक्तीने धर्मातरित झालेल्यांना पुन्हा स्वधर्मात आणणे हे हिंदुत्वाचे खरे अंग आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. केरळमधील पहिल्या अधिवेशन केंद्राचे उद्घाटन करताना सरसंघचालक बोलत होते.
मानवजातीला धर्मातराची गरजच काय, असा सवाल उपस्थित करीत, मूलभूत माणुसकी असेल तर तुम्ही काय खाता, तुमची वेशभूषा काय आहे या बाबी क्षुल्लक ठरतात, असे भागवत यांनी सांगितले. या कार्यक्रमास इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन् नायर उपस्थित होते.
एकीकडे शिक्षणाचे प्रचंड वेगाने व्यावसायिकीकरण होत असताना, महाविद्यालयीन तरुणांना रोजगार मिळत नाही कारण रोजगारासाठी आवश्यक ते कौशल्य या तरुणाकडे नसते ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे, असे नायर यांनी सांगितले. सरकारी पातळीला धोरणे तयार करताना उद्योजकतेला चालना देणे गरजेचे आहे, असेही माधवन् नायर यांनी सांगितले.