भारतीय नागरिकांच्या खिशाचा भार हलका करण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव अडीच रुपये प्रति लिटर स्वस्त केले. त्यापाठोपाठ महाराष्ट्र सरकारनेही प्रति लिटर अडीच रुपयांची सवलत जाहीर केली. परिणामी महाराष्ट्रातल्या जनतेला आता पेट्रोल व डिझेल प्रति लिटर पाच रुपयांनी स्वस्तात मिळणार आहे. केंद्राने ही घोषणा करताना उत्पादन शुल्कात प्रति लिटर दीड रुपयांची कपात करताना तेल कंपन्या प्रति लिटर एक रुपया कमी आकारतील असे सांगण्यात आले. करात सवलत दिल्यामुळे केंद्र सरकारच्या महसुलात 10,500 कोटी रुपयांचा महसूल कमी जमा होणार आहे. तसेच तेल कंपन्यांच्या नफ्यावरही विपरीत परिणाम होणार आहे. मात्र या निर्णयामुळे भारतीय नागरिकांच्या खिशातून पेट्रोल व डिझेलच्या खर्चापोटी सुमारे 11 हजार कोटी कमी जातील असे सांगण्यात येत आहे.

परंतु, याच कारणांमुळे आयओसी, एचपीसीएल व बीपीसीएल या सरकारी तेल कंपन्यांना चांगलाच फटका बसला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी हा निर्णय जाहीर करताच या तिनही कंपन्यांच्या शेअर्सचा भाव गडगडला. एचपीसीएलच्या शेअरचा भाव 12.23 टक्क्यांनी घसरला, बीपीसीएलचा भाव 10.89 टक्क्यांनी घसरला तर आयओसीचा भाव 10.57 टक्क्यांनी घसरला आहे. यामुळे तिनही कंपन्यांचे भांडवली मूल्य एकाच दिवसात 39 हजार कोटी रुपयांनी घसरले आहे. भारतीय नागरिकांना 11 हजार कोटी रुपयांचा दिलासा देताना तेल कंपन्यांच्या 39 हजार कोटी रुपयांचा बळी देण्यात आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

तेल कंपन्यांना पेट्रोल व डिझेल प्रति लिटर एक रुपया कमी दराने विकावे लागणार असल्यानं त्यांच्या नफ्यावर विपरीत परिणाम होणार आहे. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार या कंपन्यांचा नफा या एकाच निर्णयामुळे प्रत्येकी दोन ते तीन हजार कोटी रुपयांनी कमी होणार आहे. यामुळेच गुंतवणूकदारांनी ही घोषणा होताच या कंपन्यांच्या शेअर्सच्या विक्रीचा मार्ग पत्करला.