करोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने देश लॉकडाउन करावा लागला. यासाठी मी देशवासीयांची माफी मागतो. अनेक लोकांच्या गैरसोयी होत आहेत. हातावरचे पोट असलेले लोक मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जात आहेत. अनेक कष्टकरी, कामगार यांना त्रास सहन करावा लागतो आहे.  त्यासाठी मी देशवासीयांची माफी मागतो असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हे निर्णय घ्यावे लागले आहेत. ही व्हायरसविरोधातली लढाई आहे. त्यामुळे लॉकडाउन पुकारावा लागला असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मन की बात द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी देशाची माफी मागितली.

लॉकडाउनचे नियम पाळून तुम्ही इतरांची मदत करत आहात असे नाही. तर लॉकडाउन पाळून तुम्ही स्वतःचीच मदत करत आहात हे लक्षात ठेवा. बाहेर पडून कुणालाही करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आम्ही ही काळजी घेत आहोत. जे लॉकडाउनचे नियम मोडतील त्यांना पश्चात्तापच होईल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

करोनाशी लढाई करायची असेल तर लॉकडाउनसारख्या कठोर निर्णयांशिवाय पर्याय नाही. करोना व्हायरससोबतची लढाई आपल्याला जिंकायची आहे. जगभरात करोनामुळे मृतांची संख्या वाढली आहे. हा नक्कीच चिंतेचा विषय आहे. भारतात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये सांगितलं. अनेक लोक माझ्यावर नाराज असतील, मी असा कसा निर्णय घेतला? हे असे कसे पंतप्रधान आहेत? असंही अनेकांना वाटलं असेल. मात्र कठोर निर्णयांशिवाय आपल्याकडे पर्याय नाही असंही मोदींनी स्पष्ट केलं. तसंच करोनासोबतची लढाई जिंकण्याचाही निर्धार व्यक्त केला.