इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यातील अत्याधुनिक ‘अपाचे’ हेलिकॉप्टरचं शुक्रवारी पंजाब होशिआरपूरमधील एका गावामध्ये इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. अमेरिकन बनावटीची ही हेलिकॉप्टर्स मागच्यावर्षीच एअर फोर्सच्या ताफ्यात दाखल झाली आहेत.

पठाणकोट एअर बेसवरुन उड्डाण केल्यानंतर या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे वैमानिकाने होशिआरपूरमधील एका गावाच्या शेतामध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग केलं. “कंट्रोल पॅनलमध्ये वॉर्निंग अलर्ट आल्यामुळे खबरदारी म्हणून या हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले” असे इंडियन एअर फोर्सकडून सांगण्यात आले.

क्रू पूर्णपणे सुरक्षित असून कुठलेही मोठे नुकसान झालेले नाही. अमेरिकन बनवाटीच्या अपाचे AH-64E या हेलिकॉप्टर्सचा मागच्यावर्षी हवाई दलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. मिसाइलने सुसज्ज असलेले हे हेलिकॉप्टर शत्रूच्या ठिकाणांवर हल्ला करण्यास सक्षम आहे. हे लढाऊ प्रकारात मोडणारे हेलिकॉप्टर आहे.

काय आहे अपाचेचं वैशिष्टय
– अपाचेवर ३० मिमी व्यासाची चेन-गन आहे. ती मिनिटाला ६२५ गोळ्या झाडू शकते. त्यासह हायड्रा-७० रॉकेट, स्टिंगर, हेलफायर आणि साइडवाइंडर ही क्षेपणास्त्रे बसवता येतात.

– अपाची ताशी २९३ किमी वेगाने २५० किमी प्रवास करू शकते. त्याची अपाची एएच-६४ डी लाँगबो ही सुधारित आवृत्ती बोइंग कंपनीने, ब्रिटनच्या सहकार्याने १९९२ साली तयार केली. अपाची लाँगबो हेलिकॉप्टर ताशी ३५२ किमी वेगाने ४७६ किमी अंतरावर हल्ले करू शकते. आता भारतीय वायूसेनेमध्ये या हेलिकॉप्टर्सचा समावेश झाला आहे.