रोजगाराबाबत जाब विचारणाऱ्या आंदोलकांना कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मुख्यमंत्र्यांच्या या अजब सल्ल्यामुळे आंदोलकही क्षणभर आवाक झाले होते. मुख्यमंत्री कुमारस्वामी बसने कारेगुड्डा गावाकडे एका निवासी कार्यक्रमासाठी निघाले होते. दरम्यान त्यांची बस रायचूर येथे पोहोचल्यानंतर तेथे येरमारुस थर्मल पॉवर स्टेशनच्या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला आणि घोषणाबाजीला सुरुवात केली. वेतन आणि इतर प्रश्नांसंदर्भात ते आंदोलन करीत होते.


दरम्यान, या आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या बससमोर शेम, शेम अशी घोषणाबाजी केली तसेच रोजगारांसंदर्भात त्यांना जाब विचारला. आंदोलकांच्या या पवित्र्यानंतर ते चिडले आणि त्यांनी बसच्या खिडकीतून आंदोलकांवर ओरडायला सुरुवात केली. त्यानंतर ते आंदोलकांना म्हणाले, ‘तुम्ही नरेंद्र मोदींना मत दिलं आहे तर त्यांनाच जॉबचं विचारा, मला काय विचारता?’ मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर क्षणभर आंदोलकही आवाक झाले.

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी कार्यक्रमासाठी गावात एक दिवस राहण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. राज्यातील विरोधीपक्ष भाजपाने याप्रकरणी एक पुस्तिका प्रकाशित करीत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी एक दिवसाच्या थांब्यासाठी तब्बल १.२२ कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे.

भाजपाच्या या आरोपांना उत्तर देताना कुमारस्वामी यांनी म्हटले की, माझ्यावर होत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. हा माझा वैयक्तीक दौरा होता. मला यासाठी भाजपाकडून कोणतेही प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. मी माझ्या सद्सदविवेकबुद्धीने काम करीत असतो.