मागील २४ तासांमध्ये ५२५ करोना रुग्ण भारतात आढळले आहेत. त्यामुळे भारताची रुग्णसंख्या ३०७२ वर जाऊन पोहचली आहे. ३०७२ रुग्णांपैकी २१३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २७८४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आत्तापर्यंत ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातही आज ४७ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली संख्या ३३७ वर गेली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशवासीयांशी संवाद साधला. त्यांनी देशवासीयांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच ५ एप्रिलला म्हणजेच रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातले लाईट बंद करुन दिवा किंवा मेणबत्ती लावण्याचं आवाहन केलं आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन केलेलं असताना देशातली रुग्णसंख्या वाढते आहे हा चिंतेचा विषय आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनावर काँग्रेससह अनेकांनी टीका केली आहे. आजच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. टाळ्या वाजवून आणि दिवे लावून करोनाची समस्या संपणार नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तर दिवे लावायला सांगणं, मोबाईलचे टॉर्च लावा सांगणं हे पंतप्रधानांचं काम आहे का असाही प्रश्न अनेक टीकाकारांनी विचारला आहे.