अमेरिकन अंतराळ संस्थेच्या मंगळ मोहिमेतील पर्सिव्हिअरन्स रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं आहे. भारतीय वेळेनुसार १९ फेब्रवारी रोजी रात्री अडीच वाजता नासाचं हे यान मंगळावर उतरलं. या यानाच्या मदतीने मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात होती की नाही यासंदर्भात संसोधन करण्यात येणार आहे. नासाचे वैज्ञानिक या मोहिमेसाठी दिवसरात्र काम करत होते आणि त्यांच्या या प्रयत्नांना १९ फेब्रुवारी रोजी यश आलं. मात्र या वैज्ञानिकांमध्ये एका खास नावाचा समावेश आहे. हे नाव आहे भारतीय वंशाचे संशोधक संजीव गुप्ता. पर्सिव्हिअरन्स रोव्हर मोहिमेचा भाग असणारे गुप्ता हे सध्या मंगळावर असणाऱ्या पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या नियंत्रणाचं काम पाहतात. आश्चर्याची बाब म्हणजे गुप्ता हे काम नासाच्या मुख्यालयात बसून हे यान हाताळत नसून आपल्या घरा बसून मंगळावरील यानावर नियंत्रण ठेवत आहे. गुप्ता यांनी दक्षिण लंडनमध्ये एक वन बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला आहे. या फ्लॅट मधूनच पर्सिव्हिअरन्स रोव्हरला नियंत्रित करतात. करोनामुळे लागू करण्यात आलेल्या ट्रॅव्हल बॅनमुळे गुप्ता अशापद्धतीने आगळ्यावेगळ्या स्टाइलचं वर्क फ्रॉम होम करत आहेत.

नक्की पाहा फोटो >> पाच वर्ष संशोधन केल्यानंतर निवडला लॅण्डिंग स्पॉट, जाणून घ्या नासाच्या मंगळ मोहिमेचं नदी कनेक्शन

५५ वर्षीय प्राध्यापक संजीव गुप्ता हे भारतीय वंशाचे ब्रिटीश जमीन विज्ञानामधील तज्ज्ञ आहेत. ते लंडमधील इंपीरियल कॉलेजमध्ये भूशास्त्राचे धडे देतात. हे नासाच्या मंगळ मोहिमेच्या टीममधील महत्वाचे सदस्य आहेत. २०२७ साली मंगळावरुन पृथ्वीवर तेथील माती आणण्यासाठी जी मोहीम राबवली जात आहे त्यामध्येही गुप्ता यांचा सहभाग आहे. या मातीच्या नमुन्यांमुळे मंगळावर कधी जीवसृष्टी होती की नाही याबद्दलची माहिती मिळणार आहे. मंगळावरील मातीचे नमुने गोळा करणे आणि त्याच्या इतर चाचण्या करण्याचं काम पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या माध्यमातून गुप्ता आणि त्यांचे काही सहकारी पुढील काही वर्षांपर्यंत करणार आहेत.

पर्सिव्हिअरन्स रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं तेव्हा गुप्ता यांना कॅलिफॉर्नियामधील नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबमध्ये आपण उपस्थित असावं असं वाटतं होतं. मात्र त्यांना तसं करता आली नाही याचं दु:ख वाटतं. प्राध्यपक गुप्ता यांनी ऑक्सफोर्ड विद्यापिठाशी संलग्न असणाऱ्या सेंट क्रॉस कॉलेजमधून पीएचडी केली आहे. त्यांनी आपल्या कुटुंबियांना आपल्या कामाचा त्रास होऊ नये म्हणून एक वेगळा वन बीएचके भाड्याने घेतला आहे. दक्षिण लंडनमधील एका लहानश्या इमारतीच्या वर सलूनच्या वर असणाऱ्या या छोट्याश्या घरातून गुप्त सध्या काम करतात. गुप्ता यांनी सध्या आपण या घरामधून पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या नियंत्रणासंदर्भातील काम करत असल्याचं सांगितलं. तसेच या पर्सिव्हिअरन्स रोव्हर मोहिमेशी संबंधित ४०० हून अधिक लोकं घरुन काम करत असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली. सध्या प्रवासावर निर्बंध घालण्यात आल्याने आम्ही घरुनच काम करत असल्याचे गुप्ता यांनी ‘डेली मेल’शी बोलताना सांगितलं आहे.

पर्सिव्हिअरन्स रोव्हर हे जीझीरो क्रेटर या भागामध्ये मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं आहे. अनेक दृष्टीने संशोधनासाठी हा एक उत्तम भाग आहे. अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर आदळलेल्या एखाद्या लहान आकाराच्या ग्रहामुळे हा मोठा खड्डा असणारा भाग निर्माण झाल्याचा माझा अंदाज आहे. या ठिकाणी एका जुन्या नदीचे पात्र आणि प्रवाहाच्या खुणा पाहू शकतो, असं गुप्ता सांगतात. सगळेच वेगवेगळ्या ठिकाणांहून काम करत असल्याने आम्ही अनेकदा फोनवरुन, व्हिडीओ कॉलवरुन बैठका घेतो आणि मंगळाच्या कुठल्या भागातून मातीचे नमूने गोळा केला पाहिजे हे ठरवून त्याप्रमाणे योजना तयार करतो, असंही गुप्ता सांगतात.