केंद्र सरकारच्या गोरक्षणार्थ विविध उपाययोजना

देशी गायींसाठी वेगळे दुग्धोत्पादन प्रकल्प, मनरेगात गायींसाठी चारानिर्मिती तसेच प्राणी कल्याण मंडळांना गोवंशहत्या, बेकायदेशीर तस्करी याबाबत सक्षम करणे यांसारखे उपाय केंद्र सरकारने देशातील गोवंश व गोशाळा संवर्धनासाठी जाहीर केले आहेत.

पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर व कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी गोवंश व गोशाळा यावरील एका राष्ट्रीय चर्चासत्रात बोलताना गायींच्या संवर्धनासाठी वरील उपाय सुचवतानाच राज्य सरकारे, शेतकरी, गोपालक यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या गायींना संरक्षण देण्यात मदत करावी असे आवाहन केले. जावडेकर यांनी देशभरातून सहभागी झालेल्या गोसंवर्धकांना सांगितले, की गोचरभूमी म्हणजे गायराने संरक्षित केली जातील व सरकार राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत गायींसाठी हिरवा चारा तयार करील व पशुपालक शेतकऱ्यांना फुकट दिला जाईल. गोशाळांनाही चारा फुकट दिला जाईल. सरकार गायरानांचा आढावा घेणार असून, त्यानंतर धोरणात्मक व प्रशासकीय निर्णय घेतले जातील. गायी भाकड झाल्यानंतर त्यांच्या गोमूत्राचा व गोमयाचा वापर वाढवला जाईल. गायींना विकले जाणार नाही, गायी तस्करांच्या ताब्यात जाऊ देणार नाही. विविध प्राणी कल्याण मंडळांना गायींच्या तस्करीची दखल घेण्यास सांगितले जात असून, त्याबाबत काय कारवाई केली याचा अहवाल एक ते दोन महिन्यांत देण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे या प्रकरणांमध्ये कारवाई करणे सोपे होईल. प्राणी कल्याण मंडळांच्या हातात कायदा आहे त्यांनी त्याचा वापर करून सरकारला मदत करावी.

कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी सांगितले, की देशी गायींसाठी वेगळे दुग्धोत्पादन प्रकल्प सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ओडिशा व कर्नाटकात असे प्रकल्प सुरू केले आहेत. हरयाणातील कर्नाल येथे महिनाअखेरीस असे प्रकल्प सुरू केले जात आहेत. मोदी सरकारने दोन वर्षांत राष्ट्रीय गोकुळ योजनेसाठी ५८२ कोटींची तरतूद केली आहे. आधी ती केवळ ४५ कोटी रुपये होती. सिंह यांनी सांगितले, की देशी गायींच्या बीजांचे रक्षण केले जाईल व हवामान बदलांचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाईल. कारण इतर संकरित बीजांवर हवामानबदलांचा परिणाम फारसा होत नाही. गाय ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून ज्या शेतकऱ्यांकडे किंवा दलिताकडे गाय आहे तो कधी उपाशी मरणार नाही. देशात दूध उत्पादन वाढत आहे. २०१५-१६ मध्ये ते १६०.३५ दशलक्ष टन होते. ते म्हणाले, की देशी गायींचे रक्षण करणे प्रतिकूल परिस्थितीतही फायद्याचे ठरणार आहे.