भारतामध्ये मागील २४ तासांमध्ये करोनाचे १४ हजार १९९ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णसंख्येसोबतच भारतामधील करोनाबाधितांचा एकूण आकडा एक कोटी १० लाखांच्या वर गेलाय. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ झाली असून ही चिंतेची बाब असल्याचे सांगण्यात येत आहे. दिवसोंदिवस करोनाबाधितांची आकडेवारी वाढत असून त्यामुळे करोनाची दुसरी लाट अली की काय अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात सरकारी यंत्रणा आणि तज्ज्ञांनी स्पष्टपणे कोणतीही थेट भूमिका स्पष्ट केली नसली तरी सध्या सुरु असणारी रुग्णवाढ ही नोव्हेंबरनंतरची सर्वात मोठी वाढ आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधित रुग्णांची वाढ ही महाराष्ट्रात झालीय.

रविवारी करोनामुळे देशभरामध्ये ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या एक लाख ५६ हजार ३८५ वर गेली आहे. करोनावर मात करणाऱ्यांची टक्केवारी ९७.२२ पर्यंत गेलीय. म्हणजेच करोनावर आतापर्यंत एक कोटी सहा लाख ९९ हजार ४१० जणांनी मात केलीय. असं असलं तरी नवी आकडेवारी भारतीयांच्या चिंतेत भर घालणारी आहे. मागील पाच आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच सात दिवसांचा विचार केल्यास देशातील करोनाबाधितांच्या संख्येत एक लाख रुग्णांची भर पडली आहे. फेब्रुवारी २१ रोजी संपलेल्या आठवड्यात भारतामध्ये करोनाचे एक लाख ९९० हजार रुग्ण आढळले. या पूर्वीच्या आठवड्यामध्ये नव्या रुग्णांची संख्या ७७ हजार २८४ इतकी होती. म्हणजेच गेल्या आठवड्यामध्ये देशातील करोनाबाधितांच्या संख्येत तब्बल ३१ टक्क्यांची वाढ झाली आहे.

सर्वाधित रुग्णवाढ झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्रामध्ये मागील २४ तासांमध्ये सहा हजार ९७१ रुग्ण आढळून आले असून ३५ जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय. मागील १२१ दिवसांमधील हा सर्वाधिक आकडा आहे. पुण्यामध्ये रविवारी करोनाचे एक हजार १७६ नवे रुग्ण आढळून आले. तर सहा जणांनी करोनामुळे पुणे जिल्ह्यात रविवारी प्राण गमावला. जिल्हा प्रशासनाने करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ८१ टक्क्यांनी वाढली आहे. २१ फेब्रुवारी रोजी जो आठवडा संपला त्यामध्ये महाराष्ट्रात ३६ हजार ६०६ रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व सार्वजनिक, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याची घोषणा रविवारी केली. पुढील आठ दिवसांमध्ये राज्यातील रुग्णसंख्या कशी वाढते किंवा कमी होते त्यानुसार लॉकडाउनसंदर्भातील निर्णय़ घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. लॉकडाउन हा पर्याय नसला तरी करोनाची साखळी तोडण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.

केरळमध्येही करोना प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आलं होतं. मात्र तेथील परिस्थिती आता सुधरत आहे. मागील २४ तासांमध्ये केरळमध्ये चार हजार ७० करोनाचे नवे रुग्ण आढळून आलेत. शनिवारच्या तुलनेत हा आकडा ५०० ने कमी आहे. आठवड्यांचा विचार केल्यास केरळमध्ये मागील आठवड्यात ३० हजार ८७१ करोनाबाधित आढळून आले. ही सप्टेंबरनंतरची सात दिवसात झालेली सर्वात कमी वाढ आहे.

आणखी वाचा- … तर लॉकडाउन टाळता येणार नाही; मुंबईकरांना महापालिका आयुक्तांचा निर्वाणीचा इशारा

जागतिक स्तरावर अमेरिकेमध्ये करोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या पाच लाखांच्या जवळ जाताना दिसत आहे. जगातील सर्वाधिक करोना मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेमध्ये करोना लसीकरण मोहीम संपूर्ण ताकदीनिशी सुरु करण्यात आली असली तरी परिस्थिती सामान्य होण्यासाठी आणखीन बराच काळ जाईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.