व्यावसायिक बाजारपेठेच्यादृष्टीने संपूर्ण दिशादर्शक प्रणाली उभारण्याच्या भारताच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. भारतातील विविध ठिकाणांची माहिती पुरविण्याच्या उद्देशाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) प्रक्षेपित करण्यात आलेल्या सातपैकी एका उपग्रहातील तीन स्वयंचलित घड्याळे बंद पडल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. भारताकडून नुकत्याच प्रक्षेपित करण्यात आलेल्या ‘आयएनआरएसएस-१ ए’ या उपग्रहात अचूक वेळ निर्धारित करण्यासाठी स्वयंचलित घड्याळांचा वापर करण्यात आला आहे. युरोपमधून खास मागवण्यात आलेल्या या घड्याळांमुळे भारतातील ठिकाणांची अचूक माहिती पुरवण्यात मदत होणार होती. या घड्याळांशिवाय ठिकाणांबद्दलची अचूक माहिती मिळवणे शक्य नाही.
इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘आयएनआरएसएस-१ ए’ उपग्रहातील तीन स्वयंचलित घड्याळे बंद पडली आहेत. ही घड्याळे वगळता उपग्रहातील इतर घटक व्यवस्थितपणे काम करत आहेत. ‘आयएनआरएसएस-१ ए’ हा उपग्रह संदेशवहनासाठी वापरला जाणार होता. त्यामुळे या उपग्रहातील घड्याळे बंद पडल्याने संपूर्ण दिशादर्शक प्रणालीवर फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळे आता आम्ही येत्या जुलै महिन्यात नवीन उपग्रह अवकाशात पाठवणार असल्याचे किरणकुमार यांनी सांगितले.
दरम्यान, इतर उपग्रहांमध्ये बसवण्यात आलेल्या घड्याळांमध्येही अशा प्रकारचा बिघाड होण्याची शक्यता किरणकुमार यांनी फेटाळली. आम्ही भविष्यात आणखी दिशादर्शक उपग्रह अवकाशात सोडण्याचा विचार करत आहोत. त्यासाठीच्या तांत्रिक बाबींची आणि परवानग्यांची पूर्तता होणे बाकी आहे. याशिवाय, आम्ही ‘आयएनआरएसएस-१ ए’ उपग्रहातील घड्याळे पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्नही करत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय दिशादर्शक उपग्रह प्रणालीमध्ये एकूण नऊ उपग्रहांचा समावेश असून, यापैकी सात उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. तर दोन उपग्रह प्रक्षेपणाच्या टप्प्यात आहेत. या संपूर्ण प्रणालीसाठी तब्बल १४२० कोटींचा खर्च आला आहे. या प्रकल्पातील प्रत्येक उपग्रह १० वर्षे काम करू शकतो. दिशादर्शक उपग्रह प्रणालीतील शेवटचा उपग्रह गेल्यावर्षी २८ एप्रिलला अवकाशात सोडण्यात आला होता. ‘पीएसएलव्ही-सी३३’ या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या साह्याने ‘आयएनआरएसएस-१ जी’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे दळणवळणासाठी स्वतंत्र उपग्रह व्यवस्था असलेल्या देशांच्या विशेष गटात भारताला स्थान मिळाले होते. अमेरिकास्थित जीपीएसच्या धर्तीवरील ही यंत्रणा आहे.