आंतरराष्ट्रीय पोलीस समूहाचे (इंटरपोल) अध्यक्ष मेंग हाँगवेई हे चीनमधून गायब झाल्याचे वृत्त आहे. फ्रान्स पोलिसांनी हाँगवेई यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात हाँगवेई बेपत्ता झाल्याचे वृत्त आले होते. तपासाशी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाँगवेई हे सप्टेंबरच्या अखेरीस दक्षिण-पूर्व फ्रान्समधील लायन येथील इंटरपोलच्या मुख्यालयातून बाहेर पडताना अखेरचे दिसले होते. त्यावेळी ते चीनला रवाना होणार होते. इंटरपोलशी १९२ देश जोडले गेलेले आहेत.

हाँगवेई बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने दिली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हाँगवेई हे फ्रान्समधून बेपत्ता झालेले नाहीत. यूरोपीय देशांच्या मते, ते २९ सप्टेंबरला फ्रान्सला रवाना झाले होते. इंटरपोलसाठी नोव्हेंबर २०१६ मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. यापूर्वी हाँगवेई हे चीनमधील सार्वजनिक सुरक्षेचे उपमंत्री होते. २०२० पर्यंत ते इंटरपोलच्या प्रमुख पदी राहणार आहेत.

दुसरीकडे, ऑपरेशन फॉक्स हंटने दावा केला आहे की, चीन काही देशात आपल्या एजंटच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनाची मंजुरी न घेता काम करत आहे. त्यामुळे अनेक मोठे अधिकारी ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्यावर गंभीर अनुशासनाचे आरोप लावण्यात आले आहेत.