आयसिसला भारतात पाय रोवू दिला नाही गृहमंत्री

भारतीय लष्कराने सप्टेंबर २०१६ मध्ये केलेल्या लक्ष्यभेदी कारवाईनंतर पाकिस्तानातून होणाऱ्या घुसखोरीत ४५ टक्क्यांनी घट झाल्याचा दावा राजनाथसिंह यांनी केला. तसेच जगात भारतामध्ये मुस्लीम लोकसंख्या सर्वाधिक आहे तरीही आयसिस या दहशतवादी संघटनेला भारतात आपले पाय रोवता आलेले नाहीत, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राजनाथसिंह यांनी शनिवारी आपल्या खात्याच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला, त्या वेळी ते बोलत होते. देश सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही पूर्ण जबाबदारीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, असे गृहमंत्र्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

देशभरातून आयसिसच्या ९० समर्थकांना अटक करण्यात आली आहे. आयसिस आणि अन्सर उल अम्माह या संघटनांचा दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.  जम्मू-काश्मीरमधील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा नि:पात करून आम्ही शांतता प्रस्थापित करू, असेही ते म्हणाले. पंजाबमध्ये २०१५-१६ मध्ये झालेले दोन दहशतवादी हल्ले वगळता देशातील सुरक्षा आम्ही नियंत्रणात ठेवली आहे, असेही ते म्हणाले.

काश्मीर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा

  • काश्मीर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास काहीसा विलंब होणार असला तरी रालोआ सरकार त्यादृष्टीने काम करीत आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी येथे सांगितले. जम्मू-काश्मीरमधील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा पूर्णपणे नि:पात करण्याचा निर्धारही गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.
  • काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी सरकार राज्यातील जनता आणि राजकीय पक्षांना विश्वासात घेईल आणि खुलेपणाने चर्चा करील. काश्मीर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा राजकीय असेल की लष्करी, असे विचारले असता गृहमंत्र्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले, मात्र तोडगा व्यापक आणि एकात्मिक असेल, असे ते म्हणाले.