इसिस या दहशतवादी संघटनेने सीरियाच्या अनेक सनिकांना मृत्युदंड दिला असून रक्का प्रांतातील हवाईतळ ताब्यात आल्यानंतर त्यांनी हे कृत्य केले आहे. त्याची दृश्यचित्रफीत युटय़ूबवर टाकण्यात आली आहे.
 ही दृश्यफीत खरी असून त्यात इसिसचा एक अतिरेकी मारलेल्या सनिकांची प्रेते दाखवित असून त्यांच्या अंगावर आतल्या कपडय़ांशिवाय काही नाही व त्यांची तोंडे खाली दाबली गेली आहेत. त्यांना डझनभर मीटर लांबीच्या रांगेत उभे करून नंतर मारण्यात आले. जवळच प्रेते रचलेली दिसत आहेत, रॉयटर्सने स्वतंत्ररीत्या या दृश्यचित्रफितीची खातरजमा केलेली नाही. आम्ही २५० सनिकांना रक्का येथे मृत्युदंड दिला असे इसिसचा एक अतिरेकी या दृश्यफितीत सांगताना दिसत आहे. सीरियन मानवी हक्क संस्थेने युद्धातील मानवी हक्कांच्या उल्लंघनावर लक्ष ठेवले असून त्यांच्या मते १२० सनिकांना मारण्यात आले आहे.
अल काईदाशी संबंधित असलेल्या इसिसचे अतिरेकी तबका या हवाई तळावर रविवारी घुसले व त्यांनी लष्कराशी दोन हात केले व अनेक सनिकांना व अधिकाऱ्यांना पकडून मृत्युदंड दिला. सनिक व इसिस यांच्यातील हा सर्वात रक्तरंजित संघर्ष होता. तबका हा हवाई तळ ताब्यात आल्याने इसिसची उत्तरेकडील भागावर पकड मजबूत झाली आहे, असे सांगण्यात येते.