बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या अडचणींमध्ये वाढ होतानाच दिसते आहे. मंगळवारी आयकर विभागाने लालू प्रसाद यादव यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांची बेनामी मालमत्ता जप्त केली आहे. लालूप्रसाद यादव यांची मुलगी आणि राज्यसभा सदस्य मीसा भारती, तिचे पती शैलेश कुमार, तसेच लालूप्रसाद यादव यांच्या इतर दोन मुली रागिणी आणि चंदा, तसेच मुलगा तेजस्वी यादव यांच्या नावे असलेले १२ प्लॉट जप्त केले आहे. आजच आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, या सगळ्या मालमत्तेची किंमत १७५ कोटींच्या घरात आहे. तर यांचे खरेदी मूल्य फक्त ९.३२ कोटी दाखवण्यात आले आहे. आयकर विभागाने याआधीही लालूप्रसाद यादव यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असलेल्या मालमत्तेवर छापे मारले होते. हे सगळे छापे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला होता.

आयकर विभागाने नेमक्या कोणत्या मालमत्तेवर टाच आणली आहे?
१) फार्म क्रमांक २६, पालम फार्म, बिजवसन, दिल्ली
मालकी-मीसा भारती आणि शैलेश कुमार
खरेदी मूल्य- १ कोटी ४ लाख
बाजार मूल्य-४० कोटी
२) १०८८, न्यू फ्रेंडस कॉलनी
मालकी-तेजस्वी यादव, चंदा आणि रागिणी यादव
खरेदी मूल्य- ५ कोटी
बाजार मूल्य- ४० कोटी
३) जलापूर, दनापूर आणि पाटणा या ठिकाणच्या ९ जमिनी
मालकी-राबडीदेवी आणि तेजस्वी यादव
खरेदी मूल्य-१.९ कोटी
बाजार मूल्य-६५ कोटी
४) जलापूर, दनापूर आणि पाटणा या ठिकाणच्या ३ जमिनी
मालकी– राबडी देवी आणि तेजस्वी यादव
खरेदी मूल्य-१.६ कोटी
बाजार मूल्य-२० कोटी

आयकर विभागाच्या या कारवाईमुळे लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांचे धाबे दणाणले आहेत. मे महिन्यापासूनच आयकर विभागाने या कारवाईची तयारी सुरु केली होती. तसेच दोनवेळा मीसा भारती आणि तिचे पती शैलेश कुमार यांना मालमत्तेसंदर्भात स्पष्टीकरण देण्यासही सांगितले होते. मात्र या दोघांनीही हा आदेश धुडकावला होता. ज्यामुळे आयकर विभागाने दोन्हीवेळा प्रत्येकी १० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला होता. आता लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या परिवाराशी संबंधित १२ मालमत्तांवर आयकर विभागाने जप्ती आणली आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने तेजस्वी यादव यांच्या पेट्रोल पंपाचा परवानाही रद्द केला होता. सीबीआय, आयकर विभाग या संस्थांचा सरकार गैरवापर करत असल्याचा आरोप, लालूप्रसाद यादव यांनी केला होता.