पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरूवारी झारखंडमधील रांची येथून आगामी निवडणुकांचा बिगुल वाजवला आहे. रांचीत पंतप्रधान मोदींनी किसान मानधनसह अनेक विकास योजनांची सुरूवात केली. यावेळी शेतकऱ्यांना पेन्शन कार्डाचे देखील वितरण करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या बड्या नेत्यांना उद्देशून मोदींनी, स्वतःला कायद्यापेक्षा श्रेष्ठ समजणारे आज जामीनासाठी दाद मागत फिरत असल्याचे म्हटले. तसेच सरकारची १०० दिवसांमधील कामगिरी म्हणजे केवळ ट्रेलर होता, पिक्चर तर आणखी बाकी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी आपल्या खास शैलीद्वारे रांचीतील स्थानिक भाषेने भाषणाची सुरूवात केली. यावेळी मोदींनी म्हटले की, झारखंड गरिबांशी निगडीत असलेल्या मोठ्या योजनांसाठीचा लॉचिंग पॅड आहे. आम्ही येथून आयुष्मान भारतसह शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या मोठ्या योजनांची सुरूवात केली आहे. तसेच त्यांनी म्हटले की, निवडणुकीवेळी मी तुम्हाला कामगार-दमदार सरकार देण्याचे वचन दिले होते, मागील शंभर दिवसात देशाने केवळ ट्रेलर पाहिला आहे, संपूर्ण पिक्चर तर अजून बाकीच आहे. आमचा संकल्प आहे की जनतेची लूट करणाऱ्यांना त्यांच्या जागी पोहचवायचे, यावर काम देखील सुरू आहे आणि काहीजण गेले देखील आहेत. जम्मू-काश्मीरच्या विकासावरही आमचे लक्ष आहे. दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच, ज्या लोकांनी असा विचार केला होती की ते कायदा व न्यायालयापेक्षा श्रेष्ठ आहेत आज ते स्वतः जामीनासाठी दाद मागत आहेत. तुम्ही असेच सरकार पाहू इच्छित होता ना? ही तर केवळ सुरूवात आहे, पुढे संपूर्ण पाच वर्षे बाकी असल्याचेही मोदींनी यावेळी म्हटले.

या अगोदर पंतप्रधान मोदींनी साहेबगंज येथील मल्टी मॉडेल हबचे उद्घाटन केले. याची सुरूवात झाल्यानंतर जलमार्गाद्वारे लोक स्वस्त दरात मालाची वाहतूक करू शकणार आहेत. बांगलादेश, म्यानमार व इतर काही देशांमध्येही मालाची वाहतूक करणे शक्य होणार आहे. यावेळी  आज या ठिकाणाहून नव्या जलमार्गाची सुरूवात झाली असून, यामुळे झारखंडला थेट जगाशी जोडता येणार असल्याचेही मोदींनी सांगितले.

याशिवाय ‘पंतप्रधान जीवन ज्योती योजना’ आणि ‘पंतप्रधान सुरक्षा विमा योजना’ या दोन्ही योजनांशी २२ कोटींपेक्षा जास्त देशवासी जुडले असल्याचे सांगत मोदी म्हणाले की, यातील ३० लाखांपेक्षा अधिकजण झारखंडमधीलच आहेत. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पंतप्रधान जन आरोग्य योजना आणल्या गेली, त्याची सुरूवात देखील झारखंडमधुच करण्यात आली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४४ लाख गरीब रूग्णांना उपचार मिळाले आहेत. ज्यात झारखंडमधील ३ लाख जणांचा समावेश आहे. आमच्या सरकारने कामगार, व्यापारी आणि शेतकऱ्यांना पेन्शन योजना दिली. जे देशाला घडवण्याचे काम करताता त्यांचा सन्मान आमचे सरकार करत आहे.