महात्मा गांधी यांच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी हा मोठा ब्रॅण्ड आहे. आगामी काळात हळूहळू चलनातील नोटांवरूनही गांधींजींचे छायाचित्र काढले जाईल, असे वक्तव्य हरियाणातील मंत्री अनिल वीज यांनी केले होते. त्यावर महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. राजकारणी ज्या प्रकारे पैशांचा वापर भ्रष्टाचारासाठी करत आहेत, ते पाहता महात्मा गांधींचे छायाचित्र नोटांवरून काढून टाकले तर बरेच होईल, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.

खादी-ग्रामोद्योग आयोगाच्या दिनदर्शिकेवरून महात्मा गांधींचे छायाचित्र काढून टाकण्यात आल्यानंतर त्याचे देशभरात पडसाद उमटले. विरोधी पक्षांकडून आयोगासह केंद्र सरकारमध्ये सत्तेत असलेल्या भाजपवर टीका होत असतानाच, हरियाणातील मंत्री अनिल वीज यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या दिनदर्शिकेवरील गांधींचे छायाचित्र हटवून त्याजागी नरेंद्र मोदींचे छायाचित्र वापरण्यात आले, हे चांगलेच झाले, असे वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. इतकेच नाही तर हळूहळू चलनातील नोटांवरूनही गांधींजींचे छायाचित्र काढले जाईल, असेही तारे त्यांनी तोडले. भाजपनेही वीज यांच्या वक्तव्याचा निषेध करत ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर वीज यांनी हे आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी हे वक्तव्य मागे घेतो, असे वीज यांनी म्हटले असले तरी, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी त्यांना कडक शब्दांत सुनावले आहे.

भ्रष्ट राजकारणी पैशांचा वापर गैरमार्गासाठी करत आहेत. हे पाहता नोटांवरून गांधींचे छायाचित्र हटवले तर बरे होईल, असे तुषार गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, खादी-ग्रामोद्योग आयोगाच्या दिनदर्शिकेवर महात्मा गांधीऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र प्रसिद्ध केल्याप्रकरणी तुषार गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती.