मागील आठवड्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या पुद्दुचेरीत काँग्रेसचं सरकार पडलं आहे. रविवारी काँग्रेसप्रणीत सत्तारुढ आघाडीतील दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर सोमवारी झालेल्या बहुमत चाचणीमध्ये काँग्रेसला बहुमत सिद्ध करण्यात यश आलं नाही आणि काँग्रेसचं सरकार पडलं. मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी यांनी राजीनामा दिला असून पदुच्चेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय असल्याची टीका केलीय. मात्र पुद्दुचेरीत काँग्रेसला हा धक्का बसल्यामुळे निवडणुकीआधीच काँग्रेसच्या हातून आणखीन एक राज्य गेलं आहे. आता देशातील ३१ राज्य आणि केंद्राशासित प्रदेशांपैकी केवळ पाचच ठिकाणी काँग्रेस सत्तेतत आहे.

काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एक आमदाराच्या राजीनाम्याने ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ११ पर्यंत घसरलं होतं. विरोधी आघाडीकडे १४ सदस्य, तर सात जागा रिक्त आहेत. यामुळे नारायणस्वामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. पण विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्द न करता आल्याने काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे. यामुळे आता पुद्दुचेरीही काँग्रेसच्या हातून गेल्याने केवळ पाच राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. यापैकीही पंजाब आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता असून राजस्थान, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काँग्रेस युतीमध्ये सत्तेत आहे.

आणखी वाचा- हा तर राजकीय वेश्याव्यवसाय- मुख्यमंत्री

पंजाबमध्ये आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता असली तरी महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जोडीने काँग्रेसचा सत्तेत सहभाग असून महाविकास आघाडीतही काँग्रेस सर्वात छोटा पक्ष आहे. महाराष्ट्राबरोबरच राजस्थानमध्ये राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष आणि भारतीय ट्रायबल पार्टीशी युती करुन काँग्रेस सत्तेत आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे युतीचं सरकार आहे.

आणखी वाचा- राहुल गांधीच्या पायगुणामुळे पुद्दुचेरीमधील काँग्रेस सरकार पडलं; भाजपा नेत्याचा टोला

३१ पैकी २० ठिकाणी भाजपाचे एकहाती किंवा युतीमधील सरकार आहे. यापैकी १२ राज्यांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे तर आठ राज्यांमध्ये भाजपा सत्ताधारी युतीमध्ये आहे. पुद्दुचेरीमध्ये लवकरच निवडणुका होणार असल्याने तेथे आता राष्ट्रपती राजवट लागू केली जाण्याची शक्यता अधिक आहे. पुढील काही महिन्यांमध्ये पश्चिम बंगाल आणि केरळ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असल्याने या ठिकाणी सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने आक्रामक प्रचार आतापासूनच सुरु केलाय.

कुठे कुठे आहे भाजपा

अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत आहे. तर हरयाणामध्ये जननायक जनता पक्षासोबत सत्तेत असणाऱ्या भाजपाचा मुख्यमंत्री आहे. तर आंध्र प्रदेश, बिहार, मेघालय, मिझोरम, नागालॅण्ड, ओदिशा, सिक्कीम आणि तामिळनाडूमध्ये भाजपा युती करुन सत्तेत असणारा पक्ष आहे.