19 September 2020

News Flash

‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’वर बोलण्यास मनमोहन सिंगांचा नकार

आगामी निवडणुका लक्षात घेता यावर भाष्य करणे मनमोहन सिंग यांनी टाळले आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा बायोपिक असलेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’चा ट्रेलर गुरुवारी मुंबईत लॉन्च झाला. या ट्रेलरमध्ये काँग्रेसला अडचणीत आणणाऱी अनेक दृश्ये आणि संवाद असल्याने यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. दरम्यान, आज (शुक्रवारी) माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्रकारांनी या बयोपिकबद्दल विचारणा केली. मात्र, त्यांनी यावर काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र, दुसरीकडे काँग्रेस यावरुन आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेता यावर भाष्य करणे मनमोहन सिंग यांनी टाळले आहे. आज काँग्रेसच्या १३४व्या वर्धापनदिनानिमित्त २४ अकबर रोड येथे आयोजित कार्यक्रमासाठी मनमोहन सिंग यांनी सकाळी हजेरी लावली. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.


पंतप्रधानपदी असताना मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार राहिलेले संजय बारू यांच्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइममिनिस्टर’ या पुस्तकावर या चित्रपटाचे कथानक बेतलेले आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, त्यामुळे त्यांच्या अनेक गुप्त गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी मनमोहन सिंग यांची भुमिका साकारली आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर भाजपाने आपल्या ट्विटर हँडलवरुन रिट्विट केल्याने काँग्रेसचे खासदार पी. एल. पुनिया यांनी म्हटले की, हा भाजपाचा खेळ आहे. त्यांना माहिती आहे की त्यांचा कार्यकाळ आता संपत आला असून त्यांच्याजवळ जनतेला दाखवण्यासाठी काहीही उरलेले नाही. त्यामुळेच ते अशा प्रकारच्या रणनितीचा वापर करुन लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ट्रेलर लॉन्चच्यावेळी मनमोहन सिंग यांची भुमिका साकारलेले अभिनेते अनुपम खेर म्हणाले की, मनमोहन सिंग यांचे पात्र साकारणे खूपच अवघड गोष्ट होती. मुख्यत्वे त्यांचा आवाज. यासाठी त्यांनी सुमारे १०० तास मनमोहन सिंग यांच्या भाषणांचे फुटेज पाहिले. ही भुमिका मिळाल्यानंतर ६ ते ७ महिने आपल्याला तयारीसाठी लागल्याचेही त्यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे याची खूपच चर्चा रंगली आहे. ट्रेलरवरुन हे स्पष्ट होते की, या चित्रपटात काँग्रेममधील राजकारण, सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबावर निशाणा साधण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2018 12:40 pm

Web Title: manmohan singh refuses to speak on the accidental prime minister
Next Stories
1 ‘कोणत्याही तेजप्रतापला मी ओळखत नाही’, लालूंच्या मुलाला पोलीस निरीक्षकाने दिले उत्तर आणि…
2 आचारसंहितेचे उल्लंघनप्रकरणी भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात वॉरंट
3 लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची १.२५ लाख कोटींची योजना?
Just Now!
X