भारतीय जनता पक्षाचे(भाजप) अध्यक्ष अमित शहा यांनी उत्तरप्रदेशात एका दलित कुटुंबासोबत जेवण केल्याचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय झाला असताना बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. दलिताच्या घरी जाऊन जेवण केल्याची अमित शहा यांची ही कृती म्हणजे एक नाटक असल्याची टीका मायावती यांनी केली आहे. इतकेच नाही, तर अमित शहा यांच्यासाठी जेवण बनविणाऱयाचा शोध घेण्याचे आदेश देखील मायावतींनी दिले आहेत.
उत्तरप्रदेश दौऱयावर अमित शहा यांनी एका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात जोगियापूर गावात एका दलित कुटुंबात जेवण केले होते. पण अमित शहा यांनी दलिताच्या घरात जेवण घेतले असले तरी त्यांचं जेवण बनविणारा दलित नव्हता, असा संशय मायावती यांना आहे. त्यामुळेच मायावती यांनी त्या स्वयंपाक्याचा शोध घेण्याचा आदेश दिला आहे. पक्षाचे विभागीय समन्वयक डॉ. रामकुमार कुरील यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमित शहांनी ज्या घरात जेवण घेतले ते कोणी बनविले होते. त्याचा आम्ही लवकरात लवकर शोध घेऊ, असे कुरील म्हणाले. शहा यांच्यासोबत त्यावेळी अडीचशेहून अधिक मंडळी होती. तरीसुद्धा फक्त जेवणावेळी फक्त ५० जण उपस्थित होते. यावरून त्यांची जातीपातीची विचारसरणी उघड होते. उर्वरितांनी दलिताच्या घरी जेवण केले नाही, असेही ते पुढे म्हणाले.