केंद्रातील मोदी सरकार हे दुसऱ्यांच्या कामाचे क्रेडिट घेणार सरकार आहे. तसेच देशातील मुठभर श्रीमंतांसाठी काम करणाऱ्या या सरकारकडून कष्टकऱ्यांना सन्मान मिळत नाही, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर सोमवारी हल्लाबोल केला. दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअममध्ये ओबीसी संमेलनात ते बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, ज्यांच्या जवळ कौशल्य आहे, जे कष्टाचे काम करतात त्यांना मोदींच्या राज्यात सन्मान मिळत नाही, याचा फायदा दुसऱ्यांनाच मिळत आहे. मोदी सरकार देशातील केवळ १५ सर्वात श्रीमंत लोकांसाठी काम करीत आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत मात्र, त्यांची कर्जे माफ केली जात नाहीत. जे काम करतात त्यांना त्याचा थेट फायदा मिळण्याऐवजी इतरांना त्याचा फायदा मिळतो ही भारतातील सत्य परिस्थिती आहे. मोदींच्या कार्यालयात शेतकरी कधीच दिसणार नाहीत, त्यांनी आत्महत्या केल्या तरी त्यांचे कर्ज माफ होणार नाही. उलट केवळ त्या १५ लोकांचेच कर्ज माफ केले जाते.

भारतात ज्या लोकांकडे कौशल्य आहे, त्यांना बँका कधीही कर्ज देत नाहीत. कोकाकोला कंपनीचा मालक सुरुवातीला साधारण काम करीत होता. मॅकडॉनल्डवाला ढाबा चालवत होता. फोर्ड, मर्सडिज, होंडा कंपन्या सुरु करणारे मॅकेनिक होते. असे लोक भारतातही आहेत. मात्र, फोर्डसाठी बँकांनी मदत केली तशी आपल्याकडे केली जात नाही. ज्यांच्याजवळ कौशल्य आहे त्यांना देश काहाही देत नाही.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, भाजपाचे २-३ नेते आणि रा. स्व. संघ पडद्यामागून सरकार चालवत आहेत. या मुठभर लोकांनी देशाला गुलाम बनवले आहे. मात्र, लवकरच ही स्थिती बदलणार आहे. आम्ही लोकसभेत, विधानसभेत बसलो आहोत. मात्र, आमचे कोणीही ऐकत नाही. केवळ संघाचे म्हणणे ऐकून घेतले जाते. भाजपाच्या सरकारने सत्तेच्या चाव्या संघाच्या हाती दिल्या आहेत. संघ ओबीसींमध्ये फूट पाडू पाहत आहे.

काँग्रेसच्या काळात प्रत्येक जण मोकळेपणाने बोलू शकत होता. मात्र, आता लोक आपले म्हणणे मांडण्यापासून घाबरत आहेत. मात्र, आम्ही ओबीसींना त्यांचे हक्क मिळवून देऊ, सत्तेच्या चाव्या तुमच्याकडे द्यायच्या आहेत. आपल्याला एकमेकांसोबत काम करायचे आहे, असे आवाहन यावेळी राहुल गांधी यांनी ओबीसी समुदयाला केले.