भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या जीवाला मोठा धोका असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संघटना(आयएसआय) आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम मोदींच्या मागावर आहेत. तसेच आयएसआयने दाऊद इब्राहिमला मोदींच्या हत्येची सुपारी दिली असल्याचेही सुत्रांनी सांगितले.
मोदींच्या हत्येची सुपारी दाऊदला देण्यात आल्याची माहिती भारतीय गुप्तचर संघटनांनी सरकारला दिली आहे. याबाबत आयबीने तातडीने देशभर धोक्याचा इशारा दिला असल्याची माहिती एका इंग्रजी माध्यमात प्रसिद्ध झाली आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी सलग तिसऱयांदा आणि पंतप्रधानपदाच्या उमेदवारपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी सध्या देशातली चर्चेला विषय बनले आहेत. त्याचबरोबर आयएसआयसमोर मोदींची प्रतिमा हिंदुत्ववादी नेता अशी आहे. त्यामुळे मोदींना केव्हाही लक्ष्य केले जाण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या महिन्यात मोदींच्या पाटण्यात झालेल्या सभेत दहशतावद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्यामुळे मोदींच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला होता. त्यावरून पुन्हा नवे राजकारणही सुरू झाले होते. आता पुन्हा एकदा या ‘दाऊद सुपारी’च्या माहितीमुळे मोदी सुरक्षा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेला येण्याची चिन्हे आहेत.