वादग्रस्त वक्तव्ये केल्यामुळे चर्चेत आलेले भाजपचे खासदार साक्षी महाराज आणि योगी आदित्यनाथ यांनी देशातील मुस्लिमांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करतानाच ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे. जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी नुकतीच केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली. त्यामध्ये मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा वेग इतरांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्यनाथ आणि साक्षी महाराज यांनी हे मत व्यक्त केले.
देशातील मुस्लिमांची वाढती संख्या ही धोक्याची घंटा असल्याचे मत योगी आदित्यनाथ यांनी मांडले आहे. साक्षी महाराज यांनीसुद्धा या मुद्द्यावरून चिंता व्यक्त केली आहे. या दोघांनी देशात समान नागरी कायदा आणण्याची आणि लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी वेगळा कायदा करण्याची मागणी केली आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले, देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर सर्व समाजघटकांसाठी ‘हम दो, हमारे दो’ हेच सूत्र बंधनकारक केले पाहिजे. अशा पद्धतीने मुस्लिम समाजाची लोकसंख्या वेगाने वाढत राहिली, तर धोकादायक स्थिती निर्माण होईल आणि लोकसंख्येबाबत असमानता निर्माण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुस्लिम धर्मगुरूंनाही मुस्लिम समाजाच्या वाढत्या लोकसंख्येबद्दल चिंता वाटली पाहिजे आणि त्यांनी यासंदर्भात फतवा काढून समाजाला मार्गदर्शन केले पाहिजे, अशी अपेक्षा साक्षी महाराज यांनी व्यक्त केली. धर्म वाचविण्यासाठी हिंदूंनी किमान चार अपत्यांना जन्म द्यावा, असे मत साक्षी महाराज यांनीच काही महिन्यांपूर्वी व्यक्त केले होते. त्यावरून देशात वाद निर्माण झाला होता.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2015 रोजी प्रकाशित
मुस्लिमांची वाढती लोकसंख्या धोक्याची घंटा – योगी आदित्यनाथ, साक्षी महाराजांचे मत
वादग्रस्त वक्तव्ये केल्यामुळे चर्चेत आलेले भाजपचे खासदार साक्षी महाराज आणि योगी आदित्यनाथ यांनी देशातील मुस्लिमांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करतानाच ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे.

First published on: 27-08-2015 at 11:50 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muslim population alarming adityanath sakshi revive demand for uniform civil code