News Flash

“देशातल्या लसी आधी भारतीयांना द्या मग जगभरात पाठवा”; जावडेकरांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीचा केंद्राला टोला

लसीकरणावरुन राजकारण तापलं

दिवसोंदिवस महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या वाटत असून यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात असतानाच आता लसीकरण आणि करोना परिस्थितीवरुन राजकारण सुरु झालं आहे. महाराष्ट्र सरकारने ५६% लसी वापरल्याच नसल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलाय. मात्र आता या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जावडेकरांना उत्तर दिलं आहे. आधी देशातील लोकांचे लसीकरण करावे आणि मग केंद्र सरकारने इतर देशांना मदत करावी असं पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रातील लसीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या जावडेकरांनी आधी देशात निर्माण होणाऱ्या लसी देशातील नागरिकांना प्राधान्य क्रमाने देण्याऐवजी जगभरात का वाटल्या जात आहेत याचं उत्तर द्यावं, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.

नक्की वाचा >> महाराष्ट्र सरकारने ५६% लसी वापरल्याच नसल्याचा जावडेकरांचा आरोप; म्हणाले, “आधी नियोजनाचा अभाव आणि आता…”

जावडेकरांनी महाराष्ट्र सरकारवर केलेल्या टीकेसंदर्भात जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी केंद्राचं देशातल्या लसीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. भारतात लस नसली तरी चालेल पण परदेशात पाठवा असं केंद्राचं धोरण असल्याचा टोला पाटील यांनी लगावला. किती लसी आल्या याची संख्या तर माझ्याकडे नाहीय. ती संख्या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे असणार. केंद्र सरकार देशातील लोकांचं लसीकरण करण्यात थोडं स्लो आहे पण जगभरामध्ये लसींची निर्यात करण्यात आपण आघाडीवर आहोत. जगभरात खास करुन पाकिस्तान जे आपलं मित्र राष्ट्र आहे त्याला आपण लसीकरणाला मदत करत आहोत, असं सांगतानाच पाटील यांनी भारतामध्ये लसींचा तुटवडा जाणवत असल्याचंही म्हटलं आहे. तसेच जावडेकरांना उत्तर देताना, “जावडेकरांनी आधी याचं उत्तर द्यायला हवं की आपल्या देशात निर्माण होणाऱ्या लसी ते वेवगेळ्या देशांना का वाटत आहेत. आधी भारतीयांचं लसीकरण केलं पाहिजे. जगाच्या करोनाविरुद्ध लढाई जबाबदारी भारतावर आहेच पण आधी देशातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण केलं पाहिजे. ज्या नागरिकांनी सरकारला निवडून दिलं त्यांना लसीकरणामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे,” असं मत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा >> आपण देशातील लोकांना लस देण्याऐवजी लसीचे डोस इतर देशांना दान करतोय : उच्च न्यायालय

जावडेकर काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री असणाऱ्या जावडेकरांनी महाराष्ट्र सरकारवर करोनाच्या लसींचा पूर्णपणे वापर न केल्याचा आरोप केला आहे. जावडेकरांनी ट्विटवरुन हा आरोप केला आहे. “महाराष्ट्र सरकारने राज्यात पाठवण्यात आलेल्या ५४ लाख लसींपैकी १२ मार्चपर्यंत केवळ २३ लाख लसी वापरल्या आहेत. ५६ टक्के लसी वापरण्यात आलेल्या नाहीत. आता शिवसेनेचे खासदार राज्यासाठी अधिक लसींची मागणी करत आहेत,” असं जावडेकर ट्विटमध्ये म्हणाले आहेत. शिवाय पुढे त्यांनी, “आधी महामारीवर नियंत्रण मिळवताना नियोजनाचा अभाव आणि आता लसीकरणामध्ये वाईट कामगिरी,” असा टोला महाराष्ट्र सरकारच्या काराभारावर नाराजी व्यक्त करताना लगावला आहे.

लसीवरुन राजकारण

शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेमध्ये बोलातना महाराष्ट्राला अधिक प्रमाणात लसींचे डोस देण्यात यावेत अशी मागणी केली होती. त्यानंतर जावडेकरांनी हे ट्विट केलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेऊन राज्याला २ कोटी २० लाख डोस उपलब्ध करून देण्याची मागणी केली.   दर आठवड्यात २० लाख लसींचा पुरवठा करण्याची विनंती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे. आता याच लसीकरणाच्या मुद्द्यावरुन राजकारण सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे.

या पाच राज्यात सर्वाधिक रुग्ण

मागील काही आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या पत्रसूचना विभागाने (पीआयबी) केलेल्या ट्विटनुसार महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये करोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत साडेतीन कोटींहून अधिक जणांना लस देण्यात आल्याचेही या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 2:29 pm

Web Title: ncp leader jayant patil slams prakash javadekar over prioritizing export of corona vaccine scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus – …आता आपल्याला अधिक सक्रिय होण्याची आवश्यकता – मोदी
2 महाराष्ट्र सरकारने ५६% लसी वापरल्याच नसल्याचा जावडेकरांचा आरोप; म्हणाले, “आधी नियोजनाचा अभाव आणि आता…”
3 “पहाटेच्या अजानमुळे माझी झोपमोड होते”; अलाहाबाद विद्यापिठाच्या कुलगुरूंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
Just Now!
X