पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारमधील संघर्षांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी बगल दिली आणि लोकसभेच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत देशामध्ये काहीही होऊ शकते, असे सूचक विधान केले.

तथापि, या संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूलचे सरकार खाली खेचेल ही शक्यता नितीशकुमार यांनी सपशेल फेटाळून लावली.

राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. सीबीआय आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये जे काही सुरू आहे तो त्यांचा प्रश्न आहे, इतरांच्या प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करण्याचा आपला स्वभाव नाही, मात्र निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून आचारसंहिता लागू होईपर्यंतचा काळ म्हणजे केवळ एक महिना अथवा त्याहून अधिक कालावधीचा हा प्रश्न आहे, असे नितीशकुमार म्हणाले.