विरोधकांनी मोदी सरकारविरोधात दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावात शिवसेनेने भाजपाची साथ देत मित्र धर्म निभावल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, शिवसेनेच्या भुमिकेबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह कायम असल्याचे सुत्रांकडून कळते. कारण, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात संदिग्ध प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात शिवसेनेने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही असे त्यांनी म्हटले आहे. उद्या लोकसभेत सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होणार आहे.


सावंत यांनी म्हटले की, शिवसेनेचे खासदार शुक्रवारी अविश्वास प्रस्तावादरम्यान, सभागृहात उपस्थित राहतील. मात्र, त्यांची भुमिका काय असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यासंदर्भात उद्या जो निर्णय घेतील तो अंतिम निर्णय असेल.

दरम्यान, शिवसेनेने पक्षाच्या खासदारांना व्हिप जारी केल्याचे तसेच अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दुरध्वनीवरुन याबाबत चर्चा झाल्याचे वृत्त येत होते. मात्र, सावंत यांच्या प्रतिक्रियेनंतर यामध्येही संभ्रम निर्माण झाला असून अखेर उद्याच शिवसेनेची भुमिका स्पष्ट होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात वेळोवेळी नाराजी व्यक्त करणारी शिवसेना विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाच्या मतदानाच्या वेळी मोदी सरकारच्या बाजूने उभी राहणार का? याची उत्सुकता आहे. तेलगू देसम पक्षाने अविश्वास प्रस्तावासाठी पुढाकार घेतला आहे. शिवसेना खासदाराला विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली होती. त्यावेळी तेलगू देसम पक्षाचे खासदार केंद्रीय हवाई नागरी मंत्रीपदी होते. या प्रकरणात तेलगू देसमने शिवसेनेला अपेक्षित साथ दिली नव्हती. यामुळे शिवसेना तेलगू देसमवर नाराज आहे.