भारताला युद्ध नको आहे, मात्र कोणत्याही महासत्तेने देशाभिमान दुखावण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यास भारतीय जवान सक्षम आहेत, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले.

भारताला युद्ध नको आहे, प्रत्येकाच्या सुरक्षेचे संरक्षण झाले पाहिजे हीच भारताची भूमिका आहे, मात्र कोणत्याही महासत्तेने देशाभिमान दुखावण्याचा प्रयत्न केला तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यास भारतीय जवान सक्षम आहेत. भारताची कधीही कोणत्याही देशासमवेत संघर्ष करण्याची इच्छा नव्हती, शेजाऱ्यांशी शांततेचे, मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचीच भारताची इच्छा आहे कारण तीच आमची संस्कृती असून ती आमच्या रक्तात आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले. बंगळूरुमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे, त्याच्या संदर्भाने संरक्षणमंत्री म्हणाले की, भारतीय जवानांनी असामान्य धैर्य दाखविले आहे.