पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी अचानक कुशॉक बाकुला रिमपोची विमानतळावर दाखल झाले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण पंतप्रधान मोदी लेहमध्ये दाखल होईपर्यंत त्यांच्या दौऱ्याबद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. प्रसारमाध्यमांनाही मोदींच्या या दौऱ्याबद्दल कुठलीही पूर्वकल्पना नव्हती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा लेह दौरा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरला. कारण मोदींच्या या दौऱ्यातून जवानांचे मनोबल उंचावलेच पण त्याचबरोबर सीमेवार वारंवार आक्रमकता दाखवणाऱ्या चीनलाही सूचक इशारा मिळाला. त्यामुळेच लगेचच चीनने मोदींच्या या दौऱ्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या अचानक लेह दौऱ्यामागे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी, सीडीएस रावत आणि लष्करप्रमुखांनी या दौऱ्यासाठी सर्व समन्वयाची जबाबदारी पार पाडली. एनएसए डोवाल नुकतेच दोन आठवडे सेल्फ आयसोलेशनमध्ये राहून बाहेर आले आहेत. त्यांनी दिल्लीतच राहणे पसंत केले.

लेहमध्ये दाखल झाल्यानंतर मोदींनी निमू येथील तळावर जाऊन एअर फोर्स आणि लष्कराच्या जवानांबरोबर संवाद साधला. लेह दौऱ्यावर मोदींसोबत सीडीएस बीपिन रावत आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे होते. मोदींनी या लेह दौऱ्यात गलवान खोऱ्यातील संघर्षात जखमी झालेल्या जवानांची भेट घेतली तसेच पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ नेमकी काय परिस्थिती आहे, ते सुद्धा समजून घेतले.