काही दिवसांपूर्वी दुर्घटनाग्रस्त झालेल्या लायन एअरलाईन्सच्या विमानातील ब्लॅक बॉक्स शोधण्यात यश आलं आहे. या अपघातात 189 जणांना जलसमाधी मिळाली होती. सापडलेला ब्लॅक बॉक्स पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे या विमान अपघातामागे नेमकं कारण काय होतं, हे समजण्याची शक्यता बळावली आहे.

मात्र, हा ब्लॅक बॉक्स नेमका, फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) आहे की, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (सीव्हीआर) रेकॉर्डर याबाबत माहिती मिळालेली नाही. समुद्राच्या तळाशी ज्या ठिकाणी विमानाची अवशेष पडले आहेत तेथील चिखलातून हा ब्लॅक बॉक्स शोधण्यात आला आहे. ब्लॅक बॉक्स सुरक्षितपणे बाहेर काढून एका छोट्या बोटीत ठेवण्यात आल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे.

ब्लॅक बॉक्सबाबत जाणून घ्या –
फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्ड (सीव्हीआर), यालाच ब्लॅक बॉक्स असे म्हणतात. यातील एका उपकरणामध्ये कॉकपिटमधील संभाषण रेकॉर्ड होते तर दुसऱ्या उपकरणात विमानाशी संबंधित आकडे, उदाहरणार्थ वेग आणि उंचीचं मोजमाप होते. विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर तपासणीसाठी तो प्रयोगशाळेत पाठवला जातो. यात रेकॉर्ड झालेल्या डेटाद्वारे विमान दुर्घटनेच्या कारणांचा पत्ता लागतो. कोणत्याही विमानाच्या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी अतिशय कठोर आवरणाने बनवलेल्या ब्लॅक बॉक्सला अतिशय सुरक्षित अशा विमानाच्या मागील बाजूस बसविण्यात येते. प्रतिकूल परिस्थितीतही तो सुरक्षित राहावा यासाठी त्यावर अनेक आवरणे बसवलेली असतात. त्यामुळे अतिउष्णतेचा किंवा पाण्याचा यावर काहीही परिणाम होत नाही. समुद्रातही ६००० फुटांवर पाण्याखाली हे उपकरण सुरक्षित राहू शकते. अपघाताच्या वेळी हा ब्लॅक बॉक्स सहज सापडावा यासाठी त्याचा रंग लाल किंवा नारंगी असा ठेवला जातो.
उड्डाणानंतर अवघ्या 13 मिनिटांत हे विमान रडारवरुन बेपत्ता झालं होतं. ब्लॅक बॉक्स सापडल्याने विमानतळ अधिकाऱ्यांशी संपर्क तुटल्यानंतर नेमकं काय झालं होतं, याबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भीषण अपघाताचं कारणंही समजू शकतं.