३६ विकसित देशांचा अंतर्भाव असलेली ‘फायनॅन्शियल अॅक्शन टास्क फोर्स’ हा गट पाकिस्तानची दहशतवादाच्या मुद्द्यावर झाडाझडती घेणार आहे. पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना आर्थिक आणि राजकीय मदत करणं थांबवलं आहे की नाही याचा आढावा हा आंतरराष्ट्रीय गट घेणार आहे.

‘फायनॅन्शियल अॅक्शन टास्क फोर्स’ या आंतरराष्ट्रीय गटाने २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानला एका ‘आर्थिक ब्लॅक लिस्ट’ मध्ये टाकलं होतं. त्यामुळे पाकिस्तानवर अनेक आर्थिक बंधनं आली होती. पाकिस्तानकडून लष्कर ए तोयबा आणि जमात उद दावासारख्या कडव्या दहशतवादी गटांना आर्थिक मदत आणि संरक्षण पुरवलं जातं हे जगजाहीर आहे. पण २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून या लष्करी गटांवर तोंडदेखली कारवाई केली गेली होती. लष्कर-ए-तोयबाचं बँक खातं गोठवण्यात आलं होतं. पण हे खातं गोठवण्यापूर्वी लष्कर ए तोयबाला या कारवाईची ‘टिप’ देण्यात आली होती. या भयानक प्रकारानंतर ‘एफएटीएफ’ ने पाकला या ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं होतं. त्यामुळे पाकिस्तानवर अनेक आर्थिक बंधनं आली होती. पण ही बंधन या फेब्रुवारी महिन्यात उठवली गेली होती. ही बंधनं उठवण्याची आर्जवं करताना पाकिस्तानने आम्ही दहशतवाद्यांवर कारवाई करू. त्यांची आर्थिक नाकेबंदी करू अशा अनेक थापा मारल्या होत्या. ही बंधनं उठेपर्यंत पाकिस्तानने आपल्या पायघड्या सुरूच ठेवल्या होत्या पण ही बंधन उठल्याउठल्या पाकने आपले जुने रंग दाखवायला सुरूवात केली. पाकिस्तानची ही खोडी एफएटीएफमधल्या काही सभासद देशांनी पकडली. या देशांनी ही बाब एफएटीएफच्या निदर्शनाला ही बाब आणून दिल्यावर आता पाकिस्तानवर पुन्हा एकदा फोकस आला आहे. एफएटीएफच्या पुढच्या बैठकीत पाकिस्तानच्या या खोडसाळपणावर चर्चा होणार असून पाकिस्तान काही हेराफेरी करत असेल तर पाकची रवानगी पुन्हा ब्लॅक लिस्टमध्ये होऊ शकते.