भारतीय लष्कराच्या जवानांना अडकवण्यासाठी तसंच त्यांच्याकडून संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी ‘हनी ट्रॅप’च्या जागी ‘बाबा ट्रॅप’चा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, लष्करानं यासंबंधी अधिकारी आणि जवानांना एक अॅडव्हायझरी जारी केली आहे. ऑक्टोबर महिन्यात ही अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हकडून लष्कराच्या जवानांना टार्गेट करण्यात येत आहे, असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.

काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन क्रमांक, कोणत्या ठिकाणी लष्कराचा सराव होणार आहे याबाबत किंवा अन्य संवेदनशील माहिती घेण्याचा प्रयत्न पीआयओच्या काही लोकांकडून करण्यात येऊ शकतो, असं पाठवण्यात आलेल्या अॅडव्हाझरीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. लष्कराच्या एका रिपोर्टनुसार पाकिस्तानमधील काही गुप्तचर जवानांची माहिती मिळवण्यासाठी आर्मी कँट परिसरातील रेल्वेच्या काही क्लर्कनादेखील टार्गेट करत आहेत. नवभारत टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. यापूर्वी हनी ट्रॅपच्या माध्यमातून लष्कराच्या जवानांना टार्गेट करण्यात येत होतं. परंतु आता अध्यात्मिक गुरूंच्या बनावट प्रोफाईल तयार करून जवानांना लक्ष्य केलं जात आहे. आतापर्यंत १५० बनावट प्रोफाईल समोर आल्या आहेत. टिक-टॉक, स्काईप, व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुकचा त्यांच्याकडून वापर करण्यात येत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या हनीट्रॅपचे शिकार झालेल्या भारतीय लष्कराच्या दोन जवानांना अनोळखी फेसबुक प्रोफाईलशी चॅटिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राजस्थान पोलिसांनी ही कारवाई केली आहे. लान्स नाईक रवी वर्मा आणि शिपाई विचित्रा बेहरा अशी अटक करण्यात आलेल्या दोन लष्कराच्या जवानांची नावे आहेत. चॅटिंगद्वारे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना माहिती पुरवल्याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी त्यांना अटक केली. ‘सीरत’ नावाच्या फेसबूक प्रोफाईलशी या दोन जवानांचा संबंध होता. महिलेचे नावाने सुरु असलेल्या या फेसबुक अकाऊंटवर हे जवान चॅटिंग करीत होते. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांकडून नियंत्रित हा हनीट्रॅपचा प्रकार असल्याचे लष्कराच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

गुप्तचर यंत्रणा आणि सीआयडीसोबत राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाईद्वारे या दोन जवानांना संबंधीत फेसबुक प्रोफाईसोबत एकाच वेळी चॅटिंग करताना रंगेहाथ अटक केली. यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना समोर आल्याने भारतीय लष्कराकडून ऑक्टोबर महिन्यांत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांकडून अशा प्रकारे माहिती काढण्याच्या तंत्राबाबत जवानांना इशारा देण्यात आला होता. कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत सोशल मीडियावरुन माहितीची देवाण-घेवाण करु नये. तसेच कोणत्याही बोगस बाबा आणि इन्शुरन्स एजंटपासूनही सावध राहावे, असं त्यात नमूद करण्यात आलं होतं. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याने राजस्थानच्या पोखरण येथे तैनात असलेल्या एकाच युनिटमधील हे जवान पाकिस्तानच्या जाळ्यात अडकले.