विद्यार्थ्यांना परीक्षांचे वेध लागलेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून परीक्षांना सामोर जाण्यासाठी मूलमंत्र दिला. “विद्यार्थ्यांनी कोणत्याही अपयशानं खचून न जाऊ नये. अपयशी झालो तर आपण यशाच्या दिशेने जात आहोत, असा त्याचा अर्थ होतो,” असं सांगत मोदींनी मोबाईल आणि तंत्रज्ञानापासून दूर राहण्यासाठी एक उपायही त्यांनी सूचवला.
नवी दिल्लीतील तालकटोरा मैदानात परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्याचबरोबर परीक्षेच्या काळात येणाऱ्या तणावापासून दूर राहण्यासाठी काही साधे उपायही सांगितलं.
आणखी वाचा – Pariksha Pe Charcha 2020 with PM Modi: त्या रात्री मोदींच्या मनात नेमकं काय सुरु होतं?
तंत्रज्ञानाविषयी बोलताना काय म्हणाले मोदी?
तंत्रस्नेही पिढी अशी बिरूदावली मिरवणाऱ्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींनी त्यांचे गुलामही होऊ नका, असं सावध करणारा इशारा दिला. यावेळी मोदी म्हणाले, “कदाचित गेल्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात आणि या शतकाच्या सुरुवातीच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने सगळच बदलून टाकले आहे. आज तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा भाग बनले आहे. तंत्रज्ञानाचे भय बाळगता कामा नये. तंत्रज्ञनाला आपला मित्र मानले पाहिजे. तंत्रज्ञान माझ्यासाठी उपयोगी कसे असेल, याचा विचार आपण केला पाहिजे. पण, त्याचबरोबर या तंत्रज्ञानाने आपल्यावर कब्जा करता कामा नये. आज आपण जितका काळ स्मार्टफोनवर असतो, त्यांच्यापैकी १० मिनिटं आपण आपल्या आजी-आजोबांसाठी दिला पाहिजे. एकेकाळी सोशल नेटवर्किंग महत्वाचं मानलं जात होतं. पूर्वी आपल्या मित्र-मैत्रिणींना वाढदिवसासाठी भेटत होतो. आता आपण सोशल मीडियावरुनच शुभेच्छा देतो. आपण तंत्रज्ञानाचा वापर जरुर करावा, पण स्वतःला गुलाम बनवून घेता कामा नये. तंत्रज्ञानाला स्वतःच्या जीवनाचा भाग होऊ देऊ नका. दिवसातून एक तास तरी तुम्ही तंत्रज्ञनापासून दूर राहायला हवं. घरातील एक खोली अशी करावी ज्यात तंत्रज्ञानाला प्रवेश नसेल. त्या खोलीत जो कोणी येईल त्याने सर्व तांत्रिक गोष्टी बाहेर ठेऊनच यावं, असे नियम असावेत,” असं मोदी म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2020 12:42 pm