भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांनी पठाणकोट दहशतवादी हल्ल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चा रद्द झाल्याच्या वृत्ताचा सोमवारी इन्कार केला. १५ जानेवारीला होणारी भारत-पाक चर्चा रद्द झाल्याचे विधान दोवल यांनी मुलाखतीदरम्यान केल्याचा दावा सोमवारी ‘दैनिक भास्कर’ या वृत्तपत्राकडून करण्यात आला होता. पठाणकोट हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानकडून समाधानकारक तपास झाल्याशिवाय भारत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा करणार नाही, असे दोवल यांनी या मुलाखतीत म्हटले होते. मात्र, दोवल यांनी लगेचच खुलासा करत मी चर्चा रद्द झाली, असे म्हणालो नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, पाकिस्तानने या हल्ल्यासंदर्भात कारवाई केल्यासच आम्ही चर्चा करू, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. ‘दैनिक भास्कर’च्या दाव्याप्रमाणे दोवल यांनी मुलाखतीत १५ जानेवारी रोजी लाहोर येथे होणारी उभय देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक रद्द करण्यात आल्याचे म्हटले होते. पठाणकोट हल्ल्यांनंतर मागील आठवड्यात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांना भारत-पाक चर्चेसंबंधी विचारण्यात आले असता त्यांनी म्हटले होते की, सध्याची परिस्थिती पाहता आता चेंडू पाकिस्तानच्या कोर्टात आहे. आता पठाणकोट हल्ल्यासंदर्भात भारताने सादर केलेल्या पुराव्यानंतर पाकिस्तान काय कारवाई करणार, हे आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे स्वरूप यांनी सांगितले होते.