छोटय़ा शेतकऱ्यांशी साधलेल्या संवादातून शेतकरी आंदोलकांना मोदींचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली : तुमची जमीन खासगी कंपनीने बळकावली का, असा प्रश्न अरुणाचल प्रदेशमधील छोटय़ा शेतकऱ्याला विचारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आंदोलक शेतकऱ्यांना प्रत्युत्तर देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला.

पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या निमित्ताने मोदी यांनी शुक्रवारी छोटय़ा शेतकऱ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, हरियाणा, उत्तर प्रदेश, तमिळनाडू आणि मध्य प्रदेश या सात राज्यांतील दोन ते पाच एकर जमीन असणाऱ्या छोटय़ा शेतकऱ्यांचे अनुभव मोदींनी दूरचित्रवाणीद्वारे ऐकले. अरुणाचल प्रदेशमधील शेतकऱ्याने बेंगळूरुमधील खासगी कंपनीला आल्याचे पीक विकत असल्याची माहिती दिली. खासगी कंपन्या छोटय़ा शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करतील, हा दिल्लीच्या सीमांवरील आंदोलक शेतकरी संघटनांचा गैरप्रचार असल्याचे मोदी म्हणाले. कृषिबाजाराबाहेर शेतीमालाची विक्री व कंत्राटी शेती या नव्या तुरतुदींमुळे बडय़ा खासगी कंपन्या छोटय़ा शेतकऱ्यांना नाडतील, असा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.

देशात ८८ टक्के म्हणजे १० कोटींपेक्षा जास्त छोटे शेतकरी असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार छोटय़ा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही मोदी यांनी दिली. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करणाऱ्या लातूरमधील गणेश राजेंद्र भोसले यांचाही मोदींनी भाषणात उल्लेख केला. देशातील दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत असून तो खासगी व सहकारी क्षेत्राच्या आधारे केला जातो, असेही मोदी म्हणाले. मध्य प्रदेशच्या मनोज पाटिदार यांनी आयटीसीच्या ई-चौपालमध्ये सोयाबिन विकल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशमधील महाराजगंजमध्ये रामविलास यांनी ३०० छोटय़ा शेतकऱ्यांना एकत्र आणले असून एकत्रितपणे खासगी कंपन्यांना शेतीमाल विकला जात असल्याची माहिती दिली. या अनुभव कथनाचे कौतुक करत, नवे कायदे छोटय़ा शेतकऱ्यांच्या लाभाचे असल्याचेही सांगत दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन प्रामुख्याने पंजाब व हरियाणातील बडय़ा शेतकऱ्यांचे असल्याचे मोदींनी अप्रत्यक्ष सूचित केले.