जम्मू-काश्मीरमधील सरकार किमान समान कार्यक्रमावर बनले असून, त्याचा अर्थ आम्ही मित्रपक्षाच्या वक्तव्याचे समर्थन करतो असा होत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यसभेत स्पष्ट केले.
जम्मू-काश्मीरमध्ये भाजप-पीडीपी सरकार स्थापन होऊन एक दिवस होत नाही तोच काश्मीरमधील निवडणुका शांततेत पार पडल्याचे श्रेय तेथील मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी पाकिस्तान, हुरियत आणि दहशतवाद्यांना दिले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून गेले दोन दिवस संसदेमध्ये विरोधकांनी भाजपला घेरले होते. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी सईद यांच्या वक्तव्याशी भाजपचा कोणताही संबंध नाही आणि केंद्र सरकार त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करीत नाही, असे स्पष्ट केले होते. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी हा मुद्दा उपस्थित करीत सरकारची भूमिका मांडली. ते म्हणाले, जम्मू-काश्मीरमधील सरकार किमान समान कार्यक्रमावर बनले आहे. याचा अर्थ आम्ही त्यांच्या वक्तव्यांचे समर्थन करतो, असे नाही. आम्ही दहशतवाद्यांचे कोणत्याही स्थितीत समर्थन करणार नाही. देशाची एकता आणि अखंडता याच्याशी आपण कटिबद्ध असून, काश्मीरमधील नागरिकांवर आमचा विश्वास आहे.