राजस्थानातील सत्तारूढ काँग्रेस पक्षात कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत समर्थक ५० आमदारांना शुक्रवारी तीन विमानांद्वारे जैसलमेर येथे पाठविण्यात आले. त्यानंतर काँग्रेसच्या उर्वरित आमदारांनाही जैसलमेर येथे नेण्यात येणार आहे.

जैसलमेर येथे रवाना होण्यापूर्वी सर्व आमदारांना जयपूर-दिल्ली महामार्गावरील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. सर्व आमदार एकत्र राहावेत यासाठी त्यांना जैसलमेर येथे नेण्यात आल्याचे राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सिंह यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाचा एकही आमदार फुटू नये अशी मुख्यमंत्र्यांची रणनीती असल्याचेही ते म्हणाले. ज्या बंडखोरांनी पैसे घेतलेले नसतील त्यांनी पक्षात पुन्हा परतावे, असे गेहलोत यांनी म्हटले आहे.

जैसलमेर येथे पोहोचल्यानंतर या आमदारांना कडेकोट बंदोबस्तामध्ये सूर्यगडमधील एका हॉटेलवर नेण्यात आले. राजस्थान विधानसभेच्या अधिवेशनाची तारीख ठरल्यानंतर घोडेबाजाराचा दर वाढला असल्याचे वक्तव्य गेहलोत यांनी केले होते त्यामुळे आमदारांना जेसलमेर येथे नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आमदार अपात्रतेची प्रक्रिया : काँग्रेसच्या मुख्य प्रतोदांची सर्वोच्च न्यायालयात धाव

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि त्यांच्या १८ समर्थक आमदारांना अपात्र ठरविण्याच्या प्रक्रियेचा निर्णय पुढे ढकलण्याचे आदेश २४ जुलै रोजी राजस्थान उच्च न्यायालयाने दिले होते. त्याविरुद्ध राजस्थान काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील केल्यानंतर दोन दिवसांनी मुख्य प्रतोदांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाचा आदेश बेकायदा असल्याचे याचिकेत म्हटले आहे.