हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही फक्त एक कंपनी नाहीय. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही ठराविक क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्यासाठी रणनीतीक उद्दिष्टय डोळयासमोर ठेऊन काही संस्थांची उभारणी करण्यात आली. एचएएल ही भारताची हवाई क्षेत्रातील रणनीतीक संपत्ती आहे. तुम्ही देशासाठी जे कार्य केले ते जबरदस्त असून देश नेहमीच तुमचा ऋणी राहिल असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शनिवारी म्हणाले.

राफेल वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी शनिवारी बंगळुरुतील एचएएलच्या कारखान्याला भेट दिली व विद्यमान आणि माजी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. राफेल विमान तुमचा अधिकार आहे. विमान बांधणीचा तुम्हाला अनुभव आहे असे राहुल या कर्मचाऱ्यांना म्हणाले. एचएएलला अधिक प्रभावी कसे बनवता येईल त्याविषयी त्यांनी एचएएल कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.

भाजपा प्रणीत एनडीएचे सरकारच्या काळात दरवर्षी एचएएलला २२ हजार कोटींची आर्डर मिळायची. काँग्रेसच्या राजवटीत २००४ ते २०१४ दरम्यान एचएएलला वर्षाला फक्त १० हजार कोटींची ऑर्डर मिळायची. एचएएलवर विश्वास होता मग एनडीएच्या तुलनेत इतकी कमी ऑर्डर का ? असा सवाल सरकारमधील एकाने उपस्थित केला.