भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर जेवढी टीका केली तेवढा मी कणखर होत गेलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे राजकीय मतभेद आहेत, पण ते व्यक्तिगत द्वेषाच्या पातळीवर कधीच जाणार नाहीत. त्यांच्यामुळेच तर मी कणखर झालो आहे. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रेमच आहे, असे उद्गार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका गुजराती वाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत काढले.

राहुल म्हणाले की, माझे माझ्या वडिलांवर निरतिशय प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्यावर जेव्हा जेव्हा टीका केली जाते तेव्हा मला राग येतो आणि कधी कधी त्या टीकेने टीकाकारांचे जे हसे होते त्यामुळे त्यांच्याविषयी करुणाही वाटते. पण माझ्यावर जेव्हा जेव्हा अपमानास्पद टीका होते तेव्हा तेव्हा मी अधिक कणखर होत गेलो आहे. त्यामुळे मी मोदी यांचा ऋणीच आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने तुमच्या व्यक्तिमत्त्वात मोठे परिवर्तन झालेले दिसले. त्याचे रहस्य काय, असे विचारता राहुल म्हणाले की, मी जसा होतो तसाच आहे. भाजप समर्थकांनी माझी विपरीत प्रतिमा सातत्याने रंगवली आहे. पण लोकांनी मला प्रत्यक्ष पाहिले तेव्हा त्यांना सत्य काय ते कळले. माझे खरे रूप लोकांपर्यंत पोहोचले आहे, हे काहीजणांना पचलेले नाही.

तुमच्या या नव्या रूपाने मोदी यांना चिंता वाटत आहे का, असे विचारता राहुल म्हणाले, ‘‘माझी त्यांना निश्चितच भीती वाटत नाही. पण लोकांचे मत बदलत आहे, याचीच त्यांना भीती वाटत आहे.’’ अर्थात या सर्व प्रचारात मोदी यांनी गुजरातच्या प्रश्नांना स्पर्शही केला नाही. त्यांचा सर्व भर हा काँग्रेसवर आणि मनमोहन सिंग यांच्यासारख्या आदरणीय नेत्यावर टीका करण्यातच गेला, असा टोलाही राहुल यांनी लगावला.

काँग्रेस अध्यक्ष म्हणून देशाची सेवा आपण कशी कराल, असे विचारता राहुल म्हणाले की, ‘‘माझे आजोबा, माझी आजी, वडील आणि आई या सर्वानी देशाची सेवा केली आहे, पण आम्हा कुणाहीपेक्षा हा देश मोठा आहे. देशासमोर तुम्ही कुणीच नाही, ही भावना नसेल तर पक्षाध्यक्षपदही निर्थकच ठरेल.’’

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अनेक मंदिरांना दिलेल्या भेटींबाबत छेडले असता राहुल गांधी म्हणाले की, ‘‘मला मंदिरात जायला आवडते आणि त्यासाठी कुणाची परवानगी घ्यायची मला गरज नाही. मी केदारनाथ मंदिरातही गेलो होतो. ते काही गुजरातमध्ये नाही!’’

आयोगाची नोटिस

प्रचाराची मुदत संपल्यानंतर राहुल गांधी यांनी मुलाखत दिल्याविरोधात भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याबाबत आयोगानेही राहुल गांधी यांना नोटिस पाठवली आहे.