राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृ संघटना असून भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशातील सर्वच संस्थांमध्ये शिरकाव करून त्यांचे नियंत्रण हाती घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे, असा आरोप काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

ते म्हणाले, की देशात सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एकच संघटना महत्त्वाची मानली जात असून त्यांना सर्व संस्थांत शिरकाव करून नियंत्रण मिळवायचे आहे हे आतापर्यंत दिसून आले आहे. या मनोवृत्तीतूनच देशात सगळीकडे गोंधळ माजला असून त्यात न्यायालये व शिक्षण संस्थाही अपवाद नाहीत. भारताचा कारभार त्याच्या १.२ अब्ज लोकांनी करणे आवश्यक आहे, केवळ एका विचारसणीच्या लोकांनी देश चालवणे योग्य नाही.

वेगवेगळ्या संस्थांचा विचार करताना काँग्रेसचा दृष्टिकोन वेगळा आहे. आमच्या मते या संस्था देशाला पाठबळ देणाऱ्या असाव्यात. विकेंद्रीकरण, संस्थांचे स्वातंत्र्य, घटनात्मक बाबीत  हस्तक्षेप टाळणे याला महत्त्व आहे. संघाने सर्वच संस्थांमध्ये एकाधिकारशाही चालवली असून शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातही ते घुसले आहेत, त्याला आव्हान देणे आवश्यक आहे. मध्यमवर्गीय माणूस चांगल्या शिक्षणासाठी कोटय़वधी रूपये खर्च करतो. आरोग्याच्या क्षेत्रातही त्याला पैसा खर्च करावा लागतो, हे सगळे थांबले पाहिजे, संघाची मक्तेदारी संपवली पाहिजे.