माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यावर वेल्लोरमधील कारागृहात मंगळवारी सकाळी हल्ला करण्यात आला. ए जी पेरारीवलन असे हल्ला झालेल्या मारेकऱ्याचे नाव आहे.
पेरारीवलन सोबत असणाऱ्या राजेश नावाच्या कैद्याने त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे. या घटनेबद्दल कारागृह अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला असून, हल्ल्याचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर या हल्ल्यामध्ये पेरारीवलन कितपत जखमी झाला आहे, याचीही माहिती मिळालेली नाही. त्याच्यावर कारागृहातील रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.
२१ मे १९९१ रोजी श्रीपेरुम्बुदूरमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोटात राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी एकूण सात जणांना न्यायालयाने दोषी ठरविण्यात आले होते. मुरुगन, संथान, पेरारीवलन, नलिनी, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि रविचंद्रन अशी त्यांची नावे आहेत. यापैकी नलिनी हिची फाशीची शिक्षा २००० मध्ये न्यायालयाने जन्मठेपेमध्ये रुपांतरित केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाची शिफारस आणि सोनिया गांधी यांच्या मागणीनंतर हा बदल करण्यात आला होता.