काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ‘दंडा मार’ची भाषा केली तर आम्ही त्यांच्याविरोधात अंडी मारो आंदोलन करु असा इशारा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. राहुल गांधी अशा प्रकारची वक्तव्यं करत असल्यानेच अमेठीतून ते निवडणूक हरले. राहुल गांधी हे स्वतःच काँग्रेस पक्ष कमकुवत करत आहेत. ते अशाच प्रकारे बोलत राहिले तर काँग्रेस पक्ष संपेल अशीही टीका आठवलेंनी केली.

काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी एक वक्तव्य केलं होतं. ज्यामध्ये ते म्हणाले होते की, ” सध्याच्या घडीला आपल्या देशातली सगळ्यात मोठी समस्या ही बेरोजगारीची आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार निर्मिती केली नाही तर सहा महिन्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना युवा वर्ग घराबाहेर पडू देणार नाही. समजा ते बाहेर पडलेच तर त्यांना लाठ्या काठ्यांनी चोप देईल.” राहुल गांधी यांनी केलेल्या या वक्तव्याचे पडसाद लोकसभेतही उमटले. ज्यांचे वडील देशाचे पंतप्रधान होते अशा व्यक्तीने देशाच्या पंतप्रधानांबाबत असे वक्तव्य करणे निषेधार्ह आहे अशी टीका भाजपाने केली.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं. माझ्या भोवती माझ्या माता-भगिनींचं सुरक्षा कवच आहे त्यामुळे कितीही लाठ्या-काठ्या मारा मला काहीही होणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. तर संसदेतही त्यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख ट्युबलाईट असा केला आणि त्यांना उत्तर दिलं. मला सहा महिन्यांनी लाठ्या-काठ्या मारल्या जाणार आहेत हे सांगण्यात आलं ते बरंच झालं आता सूर्य नमस्कारांमध्ये वाढ करुन मी स्वतःला आणखी बळकट करेन असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला होता. आता रामदास आठवले यांनीही या टीकेवरुन राहुल गांधींना उत्तर दिलं आहे. राहुल गांधींनी दंडा मार आंदोलन केलं तर आम्ही अंडी फेकून मारु असं आठवले यांनी म्हटलं आहे.