भारतीय बॅडमिंटनमधील दोन स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या दोघी महिला एकेरीच्या अंतिम सामन्यांत एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या. या निर्णायक लढतीत सायनाने देशातील अव्वल खेळाडू आणि ऑलंपिक पदक विजेत्या सिंधूला हारवत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. त्यामुळे सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तसेच पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात किदांबी श्रीकांतला हार पत्करावी लागल्याने त्यालाही रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

सिंधू आणि सायना यांच्यात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यांत पहिल्या आणि दुसऱ्या सेटमध्ये जोरदार टक्कर पहायला मिळाली. पहिल्या सेटमध्ये सायनाने सुरुवातीपासूनच सिंधूवर आघाडी कायम ठेवली होती. तर दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने सायनाला जोरदार प्रत्युत्तर देत शेवटपर्यंत सायनाला मागेच ठेवले. मात्र, त्यानंतर सायनाने पुन्हा दमदार पुनरागमन केले. अंतिम फेरीच्या या लढतीचा निकाल अॅडव्हांटेजनंतर लागला. त्यानंतर अखेर सायना दुसरा सेटही आपल्या नावावर करण्यात य़शस्वी झाली.

दरम्यान, पायाच्या दुखापतीमुळे सिंधू मिश्र गट चॅम्पियनशीप स्पर्धेत भाग घेऊ शकली नव्हती. सिंधूने सेमीफायनलमध्ये माजी विजेती मिशेल ली ला २६ मिनिटांत २१-१८, २१-१८ ने पराभूत केले होते. माजी अव्वल खेळाडू असलेल्या सायना नेहवालने सेमीफायनलमध्ये २०१४ ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्य पदक विजेती क्रिस्टी गिलमौर हीला ६८ मिनिटांत २१-१४, १८-२१, २१-१७ ने मात दिली होती.

तर दुसरीकडे, पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अव्वल राहिलेल्या किदांबी श्रीकांतलाही हार पत्करावी लागली. मलेशियाच्या जागतिक क्रमवारीत ७व्या क्रमांकावर असणाऱ्या ली चोंग वी ने १९-२१, २१-१४, २१-१४ या सेटमध्ये श्रीकांतला मात दिली. एक तास पाच मिनिटांपर्यंत हा सामना रंगला होता. अंतिम सामन्यांत हार पत्कारावी लागल्याने श्रीकांतचे सुवर्ण हुकले त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.