डीएनएमध्ये असलेल्या जनुकीय संकेतावलीत वरच्या भागात माहितीचा आणखी एक थर असतो असे वैज्ञानिकांना दिसून आले आहे. नेदरलँड्समधील लेडन इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिक्स या संस्थेतील वैज्ञानिकांनी डीएनएचे काम कसे चालते हे आणखी सखोलपणे उलगडले असून त्यात त्यांना माहितीचा आणखी एक थर सापडला. असा थर असावा अशी शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली होती ती खरी ठरली आहे. लेडनचे भौतिकशास्त्रज्ञ हेम्लुट शेसेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी डीएनए संकेतावलीचे सादृश्यीकरण केले असता त्यांना डीएनएची नेमकी घडी व त्यांच्यातील आंतरसंबंध साधणारे दुवे मिळाले आहेत. १९५३ मध्ये जेम्स वॉटसन व फ्रान्सिस क्रीक यांनी डीएनएच्या रेणूचा शोध लावला होता व डीएनएमधील माहिती ही आपल्या शरीराचे नियंत्रण करीत असते. डीएनएच्या सर्पिलाकार रचनेत जी,ए, टी, सी या क्रमाने जनुकीय संकेत असतात. जर समजाच तुमचे डोळे तपकिरी असतील तर तुमच्या डीएनएमधील प्रथिनांना तशी संकेतावली मिळालेली असते. प्रत्येक पेशीत जी,ए, सी,टी हा क्रम सारखाच असतो तरी प्रत्येक अवयव वेगळ्या पद्धतीचे काम करीत असतो. १९८० च्या मध्यावधीपासून असे सांगण्यात येत होते की, डीएनएच्या रेणूत माहितीचा दुसरा थर असतो व ते आता खरे ठरले आहे. प्रत्येक पेशीत दोन मीटर डीएनए रेणू असतात व हे रेणू पेशीत घट्टपणे बसवलेले असतात. डीएनए ज्या पद्धतीने गुंडाळले जातात त्या पद्धतीने त्यावरील अक्षरे वाचली जातात व त्यामुळे प्रथिने प्रत्यक्ष सूचनेबरहुकूम बनत असतात. प्रत्येक अवयव त्यातील त्याला योग्य असलेली माहितीच वाचत असतो. डीएनएच्या घडय़ा कशा पडणार याचे काहीतरी वस्तुनिष्ठ गुणधर्म असावेत असे आता स्पष्ट झाले आहे. शिसेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी डीएनएवर माहितीचा दुसरा थर असतो असे ठामपणे सांगितले आहे. त्यांनी संगणक संकेतावलीत डीएनएच्या घडय़ांचे सादृश्यीकरण केले त्यात काही यादृच्छिक दुवे वापरले पण प्रत्यक्षातही डीएनएमध्ये असे दुवे असतात व तेच त्यांच्या घडय़ांची रचना ठरवतात. हे डीएनएचे धागे न्युक्लिओसोममध्ये घडय़ा करून ठेवलेले असतात. बेकर्स यीस्ट व फिसन यीस्ट या दोन सजीवात याबाबत प्रयोग करण्यात आले. डीएनएच्या उत्परिवर्तनातील बदलांमुळे जी,ए, सी,टी हा क्रम बदलतो. डीएनए रचना तंत्र बदलू शकते. त्यामुळे प्रथिनांच्या निर्मितीचे प्रमाण बदलते. प्लॉस वन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.