वॉशिंग्टन : भारताच्या हिताविरोधात असलेल्या व्यक्तींनी काश्मीर प्रश्नी जो दृष्टिकोन मांडला आहे तोच अमेरिकेतील  तथाकथित उदारमतवादी माध्यमांनी प्रसारित केला. त्यात काश्मीरमधील परिस्थितीचे एकांगी चित्रण करण्यात आले आहे, अशी परखड टीका अमेरिकेतील भारतीय राजदूत हर्षवर्धन शृंगला यांनी केली आहे.

ते म्हणाले की, काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्यात आले व त्याचा विशेष दर्जा काढून घेण्यात आला. त्याचबरोबर काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्यात आले. प्रत्यक्षात कलम ३७० ही कालविसंगत अशी तरतूद होती. हा मुद्दा कथित उदारमतवादी माध्यमांनी मांडलाच नाही. त्यांनी जे लोक भारताच्या हिताविरोधात काम करीत आहेत त्यांच्या प्रचारकी भूमिकेला बळ देणारे एकांगी चित्रण केले आहे.

शृंगला यांनी  काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्यामागची कारणे व त्यानंतर परिस्थितीत झालेली सुधारणा याबाबत अमेरिकी काँग्रेस, सिनेट व विचारवंत गट यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती मांडण्याची मोहीम अमेरिकेत सुरू केली आहे.

काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर तेथे अनेक बदल घडून येणार असून ते तेथील रहिवाशांच्या हिताचे असतील, असे सांगून ते म्हणाले,की गेली अनेक दशके नाकारले गेलेले अधिकार  काश्मिरी लोकांना मिळणार आहेत. हाच मुद्दा आम्ही जगासमोर मांडू इच्छितो. आता काश्मीरमध्ये ९० टक्के भागात निर्बंध उठवण्यात आले असून तेथे कुठलाही हिंसाचार झालेला नाही. एकही गोळी झाडली गेलेली नाही. लोकांच्या हितासाठीच आम्ही सगळे केले आहे हेच त्यातून दिसून येते, हे आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्षात घ्यावे असे त्यांनी स्पष्ट केले.

यू टय़ूबवर चित्रफीत जारी

जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्याची कारणे व त्याचे फायदे यावर एक चित्रफीत शृंगला यांनी यू टयूबवर जारी केली आहे.