जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात अद्यापही झपाट्याने वाढत आहे. करोनाबाधितांच्या संख्येबरोबर मृतांच्या संख्येतही दररोज वाढ होताना दिसत आहे. देशभरात मागील २४ तासांमध्ये तब्बल ५३ हजार ६०१ नवे करोनाबाधित आढळले व ८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या २२ लाख ६८ हजार ६७६ वर पोहचली आहे.

देशातील २२ लाख ६८ हजार ६७६ करोनाबाधितांच्या संख्येत ६ लाख ३९ हजार ९२९ अॅक्टिव्ह रुग्ण, करोनामुक्त झालेले/डिस्चार्ज मिळालेले/स्थलांतरित १५ लाख ८३ हजार ४९० जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ४५ हजार २५७ जणांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

देशात आता अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण २८.२१ टक्के, करोनामुक्त झालेले/डिस्चार्ज मिळालेले/स्थलांतरित अशांचे प्रमाण ६९.८० टक्के व मृत्यू झालेल्यांचे प्रमाण १.९९ टक्के आहे. भारत सरकारच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.