पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे सदस्य असलेले ६ दहशतवादी पंजाबमार्गे भारतात घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. राजधानी दिल्लीत दहशतवादी कारवाया करण्याचे त्यांचे मनसूबे असल्याचे सुत्रांकडून कळते. ही माहिती समोर आल्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना अॅलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पंजाबच्या गुप्तचर यंत्रणेच्या महानिरिक्षकांनी याबाबत राज्याच्या डीजीपींसह अनेक बड्या अधिकाऱ्यांना याबाबत पत्र लिहून अॅलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार, हे दहशतवादी सध्या फिरोजपूरच्या जवळपास लपून बसले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने रेल्वे स्टेशन्स, बस डेपोंसाऱख्या वर्दळीच्या ठिकाणी तपास कार्य सुरु केले आहे. पंजाबमधील फिरोजपूर जिल्हा हा भारत-पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ येतो. वेश बदलून हे दहशतवादी या मार्गे भारतात दाखल झाले असून दिल्लीकडे ते कूच करु शकतात अशी शंकाही व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, पंजाब पोलिसांकडून या दहशतवाद्यांचा संदर्भ पठाणकोटच्या मोधोपूर येथे चार संशयितांकडून झालेल्या कार लूटीच्या घटनेशी जोडून पाहिला जात आहे. त्याचबरोबर हे दहशतवादी जर दिल्लीत पोहोचू शकले नाहीत तर ते पंजाबलाही आपले टार्गेट करुन मोठा हिंसाचार घडवून आणतील. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनंतर प्रशासनाकडून फिरोजपूर शहराच्या सीमा सील करण्यात आल्या असून सर्वत्र कडक तपासणी केली जात आहे.

पंजाबमधील प्रमुख ठिकाणांवर तत्काळ विशेष नाकेबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जावी. त्याचबरोबर या प्रकरणी सर्व विभागाचे महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक या उच्चाधिकाऱ्यांशिवाय पोलीस आयुक्तांना वैयक्तिकरित्या दखल घेण्याच्या सूचना गुप्तचर यंत्रणेच्या महानिरीक्षकांनी आपल्या पत्रातून अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.