जेडीयूचे नेते नितीश कुमार यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी निवड करण्यात आली आहे. यासोबतच नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. यावर काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“नितीश कुमार हे एक एनडीएचे चांगले नेते म्हणून नुकतेच समोर आले आहेत. मात्र यावेळी, त्यांची शक्यता सारखीच नसेल. भाजपाने त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे. आता भलेही त्यांची एनडीएचे नेते किंवा मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे, मात्र दुसऱ्या कुणाकडे तरी त्यांना नियंत्रित करण्याचे रिमोट कंट्रोल असेल.” असं अन्वर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळी ११.३० वाजता नितीश कुमार यांचा शपथविधी पार पडणार आहे. सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. एनडीएची बैठक आज पार पडली असून त्यानंतर नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. भाजपाला जास्त जागा मिळाल्याने नितीश कुमार यांच्या हातातून मुख्यमंत्रीपद निसटणार असल्याची शक्यताही वर्तवली जात होती. भाजपा नेत्यांनी एकीकडे नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील असं स्पष्ट केलं असताना नितीश कुमार यांनी मात्र मौन बाळगलं होतं. यासोबतच आपण मुख्यमंत्रीपदावा दावा केला नसल्याचंही म्हटलं होतं. पण अखेर एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करत चर्चांना पूर्णविराम देण्यात आला आहे.