सात वर्षांपूर्वी पक्षातून निलंबित करण्यात आलेले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांना लवकरच माकपमध्ये पुन्हा प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे.
लोकसभेत दहा वेळा निवडून गेलेल्या ८६ वर्षे वयाच्या या माजी खासदाराची ‘घरवापसी’ माकपच्या पश्चिम बंगाल शाखेने केलेल्या शिफारशीच्या आधारावर होणार असल्याची माहिती पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. ही शिफारस पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या विचाराधीन होती, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या तीन आठवडय़ांत दुसऱ्यांदा पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी हे चॅटर्जी यांच्या बोलपूर या गृहक्षेत्रात रविवारी कार्यक्रमानिमित्ताने त्यांच्यासोबत व्यासपीठावर येणार आहेत. येचुरी यांनी या ठिकाणी त्यांच्या खासदार निधीतून एक कोटी रुपये खर्च केले आहेत.
माकपच्या केरळ शाखेने पक्षाच्या आणखी एक ज्येष्ठ नेत्या के.आर. गौरीअम्मा यांना पक्षात परत घेण्याची शिफारस केल्यानंतर चॅटर्जी यांच्या पक्षातील पुनप्र्रवेशाबाबत हालचाली झाल्या. ९४ वर्षांच्या गौरीअम्मा १९ ऑगस्ट रोजी आलापुझा येथील कार्यक्रमात पक्षात परतणार आहेत.