“करोना व्हायरसमुळे आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकलो नाही तसेच या आजारामुळे राज्याच्या विकास योजनांमध्ये अडथळे निर्माण झाले” असे राज्याचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा सोमवारी सरकारच्या वर्षपुर्तीच्यावेळी बोलताना म्हणाले. कर्नाटकात येडियुरप्पा यांच्या सरकारला एकवर्ष पूर्ण झाले आहे.

‘काहीही झाले तरी, आता पुन्हा लॉकडाउन करणार नाही’ असा निर्धार येडियुरप्पा यांनी बोलून दाखवला. “करोना व्हायरसमुळे आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकलो नाही, पण आता काहीही झाले तरी कर्नाटकात पुन्हा लॉकडाउन करणार नाही. अर्थसंकल्पात मी ज्या काही घोषणा केल्या आहेत, त्या भविष्यात पूर्ण करेन. गरज पडली, तर कर्ज काढून सर्व प्रकल्प पूर्ण करेन” असे येडियुरप्पा म्हणाले.

“कर्नाटकाच्या विकास योजनांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. अजून बरेच काही करायचे आहे. स्थिर सरकार देण्यासाठी मी कटिबद्ध आहे” असे येडियुरप्पा म्हणाले. सोशल डिस्टन्सिंग पाळून बंगळुरुमधील विधान सौध येथे सरकारची वर्षपुर्ती साजरी करण्यासाठी व्हर्च्युअल सेलिब्रेशनची व्यवस्था करण्यात आली होती.

रविवारी कर्नाटकात ५,१९९ नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. ८२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याच्या आरोग्य खात्याने ही माहिती दिली. कर्नाटकात ९६ हजार १४१ जणांना करोनाची लागण झाली. त्यात ५८,४१७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ३५ हजार ८३८ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. करोनामुळे कर्नाटकात आतापर्यंत १,८७८ मृत्यू झाले आहेत.