इजिप्तमधील सुएझ कालव्यात अडकून पडलेलं मालवाहू जहाज बाहेर काढण्यात पाच दिवसांनंतर यश आलं आहे. रॉयटर्सच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आलं आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम असा सागरी मार्ग जागतिक वाहतुकीसाठी पुन्हा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा विशेष लेख : विश्वाचे वृत्तरंग : व्यापारलोभामुळेच सुएझ-कोंडी?

पनामाचा ध्वज असलेले एव्हर गिव्हन नावाचं मालवाहू जहाज आशिया व युरोप दरम्यान वाहतुकीसाठी वापरण्यात येत होते. मंगळवारी एका निमुळत्या भागात ते आफ्रिका व सिनाई द्वीपकल्पात ते जहाज अडकून पडलं, त्यामुळे मोठी सागरी वाहतूक कोंडी झाली होती. हे अवाढव्य जहाज कालव्याच्या सहा किलोमीटर उत्तरेला दक्षिण प्रवेशद्वाराकडे ते सुएझ शहरानजीक अडकून पडलं होतं. मंगळवारपासून या जहाजाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर पाच दिवसांनंतर म्हणजेच रविवारी सायंकाळी या प्रयत्नांना यश आलं. रॉयटर्सने केप शिपिंग सर्व्हिसेसच्या हवाल्याने या जहाजाला बाहेर काढण्यात आल्याचं वृत्त दिलं आहे.

बर्नहार्ड शुल्ट जहाज व्यवस्थापन कंपनीचे तंत्रज्ञान व्यवस्थापक एव्हर गिव्हन यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी हे जहाज बाजूला काढण्याचे प्रयत्न फसले होते. हे मोठे जहाज हलवण्यासाठी आतल्या भागात पाणी ओतून विशिष्ट यंत्रणेचा वापर करून ते दूर करण्याचा प्रयत्न रविवारी करण्यात आले. या प्रयत्नांमध्ये अनेक टग बोट्स म्हणजेच मोठे जहाज अडकल्यानंतर ते खेचून बाहेर काढण्यासाठी वापरण्यात येणारी विशेष बोटी वापरण्यात आल्या. या प्रयत्नांना यश आलं असून हजारो कंटेनर असणारं हे जहाज बाहेर काढण्यात आलं आहे.

सुएझ कालवा प्राधिकरणाने शनिवारी जहाज बाजूला करण्यासाठी दोनदा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगितलं होतं. जास्त भरतीच्या लाटांचा फायदा घेऊन शनिवारी प्रयत्न केले गेले. जपानच्या शोई कायसन केके कंपनीने १०  बोटी हे जहाज बाजूला काढण्यासाठी पाठवल्या होत्या. शोई कायसेन कंपनीचे अध्यक्ष युकिटो हिगाकी यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती. हे जहाज पुन्हा तरंगू शकणार नसेल तर त्याचे कंटेनर्स वेगळे करावे लागणार आहेत, पण ते खूप अवघड आहे, असंही हिगाकी यांनी स्पष्ट केलं आहे. आता हे जहाज बाहेर काढल्यानंतर त्याच्या सुरक्षेची चाचपणी करुन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

अमेरिकेने दिलेला मदतीचा प्रस्ताव

अमेरिकेतील वृत्तानुसार व्हाइट हाऊसने इजिप्तला सुएझ कालवा मोकळा करून देण्यासाठी प्रस्ताव दिला होता. इतर देशांकडे जी क्षमता नाही ती आमच्याकडे आहे त्यामुळे हा मार्ग आम्हीच मोकळा करू शकतो असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलं होतं.